Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:22 IST2025-10-17T12:39:57+5:302025-10-17T13:22:11+5:30
Diwali Konkan Railway New Regular Time Table 2025: कोकण रेल्वेवरील प्रवास आता वेगवान तर होणारच आहे, याशिवाय काही ट्रेनच्या फेऱ्यांमध्येही वाढ होणार आहे.

Konkan Railway New Regular Time Table 2025: कोकण रेल्वेवरील प्रवास म्हणजे प्रवाशांसाठी एक पर्वणीच. कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वे म्हणजे एक मोठा आधार आहे. निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, बोगदे, मोठे पूल, नद्या-नाले, धबधबे यांनी कोकणाचा रेल्वे मार्ग अगदी नटलेला आहे. परंतु, एकच ट्रॅक असल्यामुळे अनेकदा या मार्गावर समस्यांचा सामना करावा लागतो. तरीही कोकण रेल्वे अगदी व्यवस्थितपणे वेळापत्रक पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करते.
कोकणवासीयांची दिवाळी गोड होणार आहे. कारण, कोकण रेल्वे मार्गावर आता नियमित वेळापत्रक लागू होत आहे. यामुळे प्रवासाचा वेग तर वाढणार आहेच, शिवाय काही सेवाही वाढणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले होते. परंतु, यंदा पावसाळी वेळापत्रकाचे १५ दिवस कमी करण्यात आले होते.
कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक लवकरच समाप्त होणार असून २१ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. यामुळे दिवाळीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल आणि इच्छित ट्रेनच्या वाढीव फेऱ्यांमधून प्रवास करणे शक्य होणार आहे.
भौगोलिकदृष्ट्या कोकण रेल्वेवरून ट्रेन, मालगाडी चालवणे आव्हानात्मक आहे. पावसाळ्यात ट्रेन चालवणे एक मोठी कसोटी असते. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचा धोका असतो. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी होते. त्यामुळे ट्रेनच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागते. कोकण रेल्वेतर्फे रोहा – ठोकूरदरम्यानच्या ७३९ किमी पट्ट्यात पावसाळी कामे केली जातात.
कोकण रेल्वेवरील सर्व सिग्नल यंत्रणेसाठी एलईडी दिवे बसविल्याने दृश्यमानता सुधारली. तरीही पावसाळ्यातील नैसर्गिक धोका टाळण्यासाठी, कोकण रेल्वेच्या एकूण ७३९ किमी मार्गापैकी वीर – उडुपी दरम्यानच्या ६४६ किमी लांबीच्या मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात आली. या वेगमर्यादेमुळे ट्रेन अगदी धीम्या गतीने धावतात. इतर भागात सामान्य वेगमर्यादा लागू असते.
सुरक्षेच्या कारणास्तव दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक असते. मात्र, यावर्षी कोकण रेल्वेने पूर्व पावसाळी कामे केल्याने व इतर पायाभूत कामे पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकात सुधारणा केली. १० जूनऐवजी १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रक जाहीर केले. तर, ३१ ऑक्टोबरऐवजी २० ऑक्टोबरपर्यंतच पावसाळी वेळापत्रकाचे नियोजन केले. त्यामुळे पावसाळी वेळापत्रकातील १५ दिवस कमी झाले.
प्रवाशांना २१ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रकानुसार प्रवास करता येणार आहे. त्यामुळे मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गतीमान होणार आहे. सीएसएमटी – मंगळुरू जंक्शन, सीएसएमटी – मडगाव जंक्शन कोकणकन्या एक्स्प्रेस, एलटीटी – करमळी एक्स्प्रेस, दादर टर्मिनस – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस, सीएसएमटी – मडगाव जंक्शन वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी – मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी – मडगाव जंक्शन तेजस एक्स्प्रेस यासह अनेक ट्रेनचे वेळापत्रक नियमित होणार आहे.
मुंबई ते गोवा दरम्यानचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक वंदे भारतचा प्रवास निवडतात. कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकानुसार, जून ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ते गोवा मार्गावरील वंदे भारत ट्रेन आता आठवड्यातील तीन दिवस चालवली गेली.
आता कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे नियमित वेळापत्रक ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर २०२५ पासून मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन शुक्रवार वगळता संपूर्ण आठवडा चालवली जाणार आहे. पावसाळ्यात केवळ तीन दिवस चालणारी ट्रेन आता आठवडाभर चालणार आहे.
गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस नियमित वेळापत्रकानुसार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी मुंबईतून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ०१ वाजून १० मिनिटांनी मडगाव गोवा येथे पोहोचेल.
तर गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी दुपारी ०२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. त्यामुळे वाढलेल्या फेऱ्याचा प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता कोकण रेल्वेने जादा रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०७३६५ एसएसएस हुबळी जंक्शन – मडगाव जंक्शन मार्गे यशवंतपूर जंक्शन एक्स्प्रेस शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजता एसएसएस हुबळी जंक्शन येथून सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७३६६ मडगाव जंक्शन – बंगळुरू सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल मार्गे बंगळुरू एक्स्प्रेस शनिवारी सकाळी ६.३० वाजता मडगाव येथून सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता बेंगळुरू येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०६२०५ बंगळुरू – मडगाव एक्स्प्रेस रविवारी दुपारी १२ वाजता बंगळुरू येथून सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता मडगाव येथे पोहचेल. गाडी क्रमांक ०६२०६ मडगाव – बंगळुरू एक्स्प्रेस सोमवारी सकाळी ६.३० वाजता मडगाव येथून सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी बंगळुरू येथे रात्री ११.३० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७३१७ क्रांतीवीरा सांगोली रायन्ना बंगळुरू – वास्को दा गामा स्पेशल एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री ११.२५ वाजता क्रांतीवीरा सांगोली रायन्ना बंगळुरू येथून सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी दुपारी २.५५ वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०७३१८ वास्को द गामा ते बंगळुरू विशेष एक्स्प्रेस वास्को द गामा येथून शनिवारी सायंकाळी ५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता बंगळुरू पोहोचेल.