सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:05 IST2025-08-11T18:22:19+5:302025-08-11T19:05:49+5:30

Maratha Sardar Raghuji Bhosale Sowrd feature and Importance : शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली.

ही तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त मिळाले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने तातडीने मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाचा सहभाग नोंदवला आणि तो लिलाव जिंकला. ज्या मध्यस्थाने हा लिलाव जिंकला, त्याला आज लंडनमध्ये प्रत्यक्ष भेटून कायदेशीर बाबी पूर्ण करुन तलवार ताब्यात घेण्यात आली.

रघुजी भोसले प्रथम (१६९५ ते १४ फेब्रुवारी १७५५) हे नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार होते. रघुजी भोसले यांचे शौर्य आणि युद्धनीती यांवर प्रसन्न होवून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही पदवी दिली होती.

रघुजी भोसले प्रथम यांनी १७४५ आणि १७५५ मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला. याचबरोबर रघुजींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांदा, छत्तीसगढ, संबळपूर याही प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचाही पराभव करून दक्षिण भारतात आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला. अठराव्या शतकातील एक अत्यंत धाडसी मराठा सेनानी म्हणून रघुजी भोसलेंकडे बघितले जाते. नागपूर भोसलेंच्या भौगोलिक सीमांमध्ये लोखंड, तांबे यांच्या खाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या.

या वस्तूंचा वापर इतर वस्तूंसोबतच शस्त्रे बनवण्यासाठीही केला जात असे. नागपूरकर भोसले घराण्यातील राजशस्त्रे निर्मिती आणि सौंदर्य यांचा अजोड मिलाफ आहेत. आज लंडन येथे लिलावात निघालेली रघुजी भोसले यांची तलवार ही मराठा शैलीच्या ‘फिरंग’ पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे.

सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही तलवारीची वैशिष्ट्ये आहेत. तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून पात्याच्या खजान्याजवळ पाते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे. युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातल्या उच्च वर्गांमध्ये प्रसिद्ध होती.

पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग’ हा देवनागरी लेख सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे. पात्यावरील लेख ही तलवार रघुजी भोसले यांच्यासाठी बनवली गेली होती किंवा त्यांच्या वापरातील होती याकडे निर्देश करतो.

तलवारीच्या मुल्हेरी मुठीवर सोन्याच्या पाण्याने कोफ्तगरी नक्षी काढलेली आहे. तलवारीच्या उभट मुसुमेला हिरव्या रंगाचे कापड गुंडाळलेले आहे. रघुजी भोसले प्रथम यांची ही फिरंग तलवार अनेकार्थांनी महत्वपूर्ण आहे.