वय वंदना कार्ड काढले का? ज्येष्ठांना मिळेल ५ लाखांचे आरोग्य कवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 19:12 IST2026-03-31T19:00:57+5:302026-03-31T19:12:55+5:30

सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या आयुष्मान योजनेनंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी 'वय वंदना' योजना पुढे आली आहे. ७० वर्षांवरील नागरिकांच्या वाढत्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन ही विशेष तरतूद करण्यात आली आहे.

आयुष्मान आणि वय वंदना कार्डमध्ये काय फरक? - आयुष्मान कार्डधारकांना वर्षाला ५ लाखांपर्यंत उपचार मिळतात तर वय वंदना कार्डधारक ज्येष्ठांना ५ लाखांपर्यंत आरोग्य कवच आहे.

ज्येष्ठांना ५ लाखांपर्यंत उपचारांची तरतूद - ७० वर्षांवरील नागरिकांना वार्षिक ५ लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार आहे. कुटुंबाऐवजी व्यक्तीवर आधारित लाभ आहे. गंभीर आजारांवरील खर्चाची मोठी बचत होणार आहे.

महागड्या शस्त्रक्रिया, गंभीर आजारांचा समावेश - हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर उपचार, किडनी, लिव्हर संबंधित आजार, अपघाती उपचार आणि इतर गंभीर आजारावरील उपचार या योजनेंतर्गत होणार आहे.

पूर्णपणे कॅशलेस व पेपरलेस प्रक्रिया - या योजनेमध्ये रुग्णालयात थेट कॅशलेस उपचार मिळणार आहे. याकरिता कागदपत्रांची गरज कमी असून ऑनलाइन मंजुरी प्रणाली आहे.

सरकारीसह खासगी रुग्णालयातही लागू - सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार सुविधा आहे. त्याचबरोबर मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयातही सुविधा मिळणार आहे. ग्रामीण व शहरी भागात उपलब्धता राहणार आहे.

असे बनवा वंदना कार्ड - आशा वर्करच्या माध्यमातून घरबसल्या वय वंदना कार्ड काढता येणार आहे. याकरिता आधार कार्ड व मोबाईल नंबर आवश्यक आहे. ओटीपीद्वारे पडताळणी होईल.

इथेही काढता येईल कार्ड- महा-ई-सेवा केंद्र, सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर), सरकारी रुग्णालये तसेच योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात तसेच सरकारी स्वस्त धान्य दुकानातून हे कार्ड काढता येणार आहे.