हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करत काँग्रेसने महाराष्ट्रात खेळलीय मोठी खेळी, अशी आहे त्यांची कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:20 IST2025-02-14T13:15:40+5:302025-02-14T13:20:21+5:30

Harshvardhan Sapkal News:पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसच्या राज्यातील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करताना हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यपदी निवड केली आहे. सपकाळ यांची निवड करून काँग्रेसने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खेळी केली आहे. काँग्रेसने या खेळीमधून खेळलेल्या चार महत्त्वाच्या चाली पुढीलप्रमाणे आहेत.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. पक्षाला अवघ्या १६ जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसच्या राज्यातील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करताना हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यपदी निवड केली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतील अनेक बडे नेते असताना हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्याने राजकीय वर्तुळात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र सपकाळ यांची निवड करून काँग्रेसने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खेळी केली आहे. काँग्रेसने या खेळीमधून खेळलेल्या चार महत्त्वाच्या चाली पुढीलप्रमाणे आहेत.

हर्षवर्धन सपकाळ हे मराठा समाजातील आहेत. मराठा समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात सुमारे २८ टक्क्यांहून अधिक आहे. ओबीसींनंतर मराठा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जातीसमुह आहे. तसेच राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाची मतं ही निर्णायक आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या १३ जागांमध्ये मराठा समाजाची मतं अनेक ठिकाणी निर्णायक ठरली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत मराठा समाज महायुतीकडे वळल्याने काँग्रेसचं नुकसान झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करून मराठा व्होटबँक मजबूत करण्याचा काँग्रेसचा मानस आहे.

महाराष्ट्रात मराठा समाजातील व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपद देण्यामागे मराठा समाजाच्या मतांसाठी पक्षाचं महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि ठाकरे गटावर असलेलं अवलंबित्व करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे. एकेकाळी मराठा समाज हा बहुतांशी काँग्रेसचा मतदार होता. मात्र सध्या मराठा समाज हा अनेक पक्षांत विखुरलेला आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात मराठा मते आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील या प्रभावी जातीला आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसने मराठा समाजातील व्यक्तीला राज्यात महत्त्वाचं पद दिलं आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा ओबीसी मतांवर विशेष लक्ष देत होता. तर आघाडीतील शरद पवार गट आणि ठाकरे गट मराठा मतांची बेगमी करायचे. मात्र गेल्या काही काळात ओबीसी समाजामध्ये भाजपाने मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. त्यामुळे केवळ ओबीसी मतांवर विसंबून न राहता इतर समाजाच्या मतांमध्येही आपला विस्तार करण्याची रणनीती काँग्रेसने गांभीर्याने आखली आहे. त्यासाठीच मराठा समाजातून येणाऱ्या आणि आदिवासी मतांवर चांगली पकड असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मागच्या काही काळात काँग्रेसमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोल हे मूळचे काँग्रेसमधील असले तरी ते भाजपामध्ये फिरून आलेले होते. तरीही त्यांना काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासह पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली होती. मात्र आता काँग्रेसने निष्ठावंत कार्यकर्त्यांना अधिक महत्त्व देण्याचा विचार केला असून, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करत काँग्रेसने तसा स्पष्ट संदेश दिला आहे.

हर्षवर्धन सपकाळ हे मराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. तसेच ते मागच्या २५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. १९९९ मध्ये ते सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष बनले होते. २०१४ मध्ये ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. ते काँग्रेसच्या पंचायती राज विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीसांसह गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेश या राज्यांचे सहप्रभारी आहे.