मुक्या प्राण्यांनाही उष्माघाताचा होतो त्रास; काय काळजी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:47 IST2026-03-26T18:32:17+5:302026-03-26T18:47:17+5:30
तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. माणसांनाच नव्हे तर दुभती जनावरे, पाळीव प्राण्यांनाही त्याचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे जनावरांच्या आहार, वाढ, प्रजनन क्षमता तसेच दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. सतत उन्हात राहिल्याने उष्माघात होऊन प्राण्यांचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या अनमोल पशुधनाची उन्हाळ्यात अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. या वाढत्या उष्णतेचा मानवाच्या दैनंदिन व्यवहारावर जसा परिणाम जाणवतोय, तसाच परिणाम पशुधनावरही आढळून येत आहे. उष्ण लहरीमुळे जनावरांची क्रयशक्ती, प्रजननक्षमता, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तसेच उत्पादनात कमी येते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

वेळेवर पाणी, आहारासह सावलीची गरज - उष्णतेच्या लाटेत पशुपालकांनी जनावरांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. वेळेवर पाणी, सावली आणि योग्य आहार दिल्यास उष्माघात टाळता येतो. कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्याल? - पाळीव प्राण्यांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी त्यांना थंड ठिकाणी व सावलीत ठेवावे, स्वच्छ व भरपूर पाणी उपलब्ध करून द्यावे, उन्हात फिरवणे टाळावे, हलका व पौष्टिक आहार द्यावा.

आहार-चारा-पाण्याचे नियोजन - उन्हाळ्यात जनावरांना भूक कमी आणि तहान जास्त लागते. त्यामुळे गुरांना जास्तीत जास्त हिरवा चारा खाण्यास व मुबलक पाणी पिण्यास द्यावे. साधारण दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यास द्यावे. त्यामुळे जनावरांच्या शरीरातील तापमान नियंत्रित राहते. यासह आपण जर गुरांना पाण्यात मीठ आणि पीठ टाकून पिऊ घातल्यास ते फायदेशीर असते.

वेळेवर पाणी, आहारासह सावलीची गरज - उष्णतेच्या लाटेत पशुपालकांनी जनावरांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. वेळेवर पाणी, सावली आणि योग्य आहार दिल्यास उष्माघात टाळता येतो. कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

उष्णतेमुळे जनावरे टाकताहेत धापा - अतिउष्णतेमुळे जनावरे सतत थापा टाकताना दिसतात. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना अधिक त्रास सहन करावा लागू शकतो, त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते.

उष्माघाताची लक्षणे कोणती ? - जोरात श्वास घेणे, तोंडातून लाळ गळणे, शरीराचे तापमान वाढणे, सुस्ती, हालचाली कमी होणे, काही प्रकरणांत जनावरे बेशुद्धदेखील पडू शकतात. उष्णतेमुळे दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनात घट होत आहे. तसेच प्रजनन क्षमतेवरही परिणाम होत असून, गर्भधारणेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वाढते.

















