एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन! बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदारांचा दिनक्रम ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 01:06 PM2022-06-29T13:06:58+5:302022-06-29T13:21:21+5:30

विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ५१ आमदारांनी सरकारविरोधात भूमिका घेतल्यानं राज्यातील मविआ सरकार धोक्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी ३० जूनला सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.

विधिमंडळाचं विशेष अधिवेशन ३० जूनला भरवलं आहे. त्यासाठी भाजपा आणि बंडखोर शिवसेना आमदारांनी विशेष खबरदारी घेतली आहे. आज सकाळी एकनाथ शिंदे आसामच्या कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत बंडखोर आमदारही होते.

गुवाहाटीतील आमदारांना थेट मुंबईत का आणलं जात नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मात्र खबरदारी म्हणून शिंदे गटातील आमदारांना गुवाहाटीतून महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात गोव्यात मुक्कामी आणणार आहे.

मागील काही दिवसांपासून आसाममध्ये पावसानं थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे. पुढील २-३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे कुठेही विमान उड्डाणावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी आमदारांना आजच गुवाहाटीतून गोव्यात नेणार आहेत.

दुपारी ३.३० च्या सुमारात शिंदे गटातील सर्व आमदारांना गुवाहाटीतून विमानाने गोव्यात आणलं जाणार आहे. संध्याकाळी ५.३० ते ६.३० दरम्यान आमदार गोव्यात पोहचतील. गोव्यातील ताज रेसिडेन्सी हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे.

विधान भवनात उद्या सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन होणार आहे. त्यासाठी गोव्यातून सकाळी ८ वाजता आमदार मुंबईसाठी रवाना होतील. आसाममध्ये पावसाचा इशारा असल्याने कुठेही गडबड होऊ नये यासाठी बंडखोर आमदारांना गोव्यात आणलं जात आहे.

या शिंदे गटातील आमदारांना मुंबईत आणल्यानंतर भाजपा आमदारांसोबत सर्व ताजमध्ये थांबतील त्यानंतर सर्व एकत्र विधिमंडळाकडे जातील. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तानाट्यात गुजरात, आसाम आणि त्यानंतर गोव्याचा समावेश झाला आहे.

सुप्रीम कोर्टात आमदारांनी संरक्षणाबाबत विधान केले होते. त्यावर कोर्टाने या आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारसोबत राज्य सरकारची आहेत. त्यामुळे आमदारांना सुरक्षित विधिमंडळात आणण्यासाठी सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

याबाबत एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलले की, आता आम्ही उद्या सर्व आमदारांना घेऊन फ्लोअर टेस्ट साठी जाणार आहोत आणि जी कोणतीही प्रक्रिया पार पाडायची असेल, त्या पद्धतीची पूर्तता पार पाडण्यासाठी आम्ही उद्याच मुंबईत जाणार आहोत असं त्यांनी सांगितले.

या सर्व घडामोडीत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची अग्निपरीक्षा होणार आहे. विधिमंडळात बहुमत चाचणी होण्याआधीच उद्धव ठाकरे राजीनामा देतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ३० जूनला ठाकरे सरकारचा फैसला होणार आहे.