पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 06:25 AM2024-05-15T06:25:16+5:302024-05-15T06:27:19+5:30

पंतप्रधान मोदी यांची जंगम मालमत्ता ५२ टक्क्यांनी वाढली. निवासी भूखंड दान केला.

pm narendra modi has neither a house nor a car and tax paid on 3 lakhs with total wealth of 3 crores | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती

लोकमत न्यूज नेटवर्क, वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत म्हणजे त्यांचा सरकारी पगार आणि त्यांच्या बचतीवर मिळणारे व्याज. त्यांच्याकडे ३.०२ कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्यांनी ३ लाख ३३ हजार १७९ रुपये आयकर भरला आहे. शपथपत्रातील माहितीनुसार त्यांच्याकडे ना घर आहे ना गाडी.

पंतप्रधान मोदी यांची २०१४ ते २०१९ दरम्यान जंगम मालमत्ता ५२ टक्क्यांनी वाढली. त्यांची बहुतेक जंगम मालमत्ता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १.२७ कोटी रुपयांच्या मुदत ठेवींच्या स्वरूपात आहे. पंतप्रधान मोदींकडे कोणतेही हत्यार नाही किंवा त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.

भूखंड केला दान

पंतप्रधान मोदी यांनी २०१९ मध्ये शपथपत्रात त्यांच्याकडे निवासी भूखंड दाखवला होता, परंतु २०२४ च्या शपथपत्रात त्यांनी गांधीनगरमधील ही जमीन दाखवली नाही. ही जमीन त्यांनी मानमंदिर फाऊंडेशनला दान केली. तेथे नादब्रह्म कला केंद्र बनवण्यात येणार आहे.

३३ पटीने वाढले बँकेतील जमा

नरेंद्र मोदी यांच्या बँक खात्यात एकूण २.८६ कोटी रुपये जमा आहेत. १७ वर्षांमध्ये त्यात ३३ पट वाढ झाली आहे.

९ लाखांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे

पंतप्रधान मोदी यांनी काही * पैसा बचत, विमा आणि गुंतवणुकीतही लावला आहे. त्यांच्याकडे ९,१२,३९८ रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी) आहेत. आधी त्यांच्याकडे २ लाखांची २ एलआयसी पॉलिसीही होती. २०१२ मध्ये २० हजारांचा एल अँड टीचा इन्फ्रास्ट्रक्चर बॉडही त्यांच्याकडे होता. आता तो नाही.

पंतप्रधानांच्या हातात किती रोकड?

नरेंद्र मोदी यांच्याकडे ५२,९२० रुपये रोख आहेत. ३१ मार्च २०१९ पर्यंत त्यांच्याकडे ३८,७५० रुपये रोख स्वरूपात होती. मोदींच्या बँकेत ४,१४३ रुपये जमा आहेत. तर २०१४ मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ३२,७०० रुपये रोख होती आणि २६.०५ लाख रुपये बँकेत शिल्लक होती. ३२.४८ लाख रुपये मुदत ठेव योजनेत होते.

२ लाखांच्या ४ अंगठ्या, १५ वर्षांत एकाही दागिन्याची खरेदी नाही...

शपथपत्रानुसार, मोदींकडे २ लाख किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, पण त्या ते घालत नाहीत. त्यांनी वर्षानुवर्षे त्या जपून ठेवल्या आहेत. मागील १५ वर्षात त्यांनी कोणतीही दागिने खरेदी केलेली नाही.


 

Web Title: pm narendra modi has neither a house nor a car and tax paid on 3 lakhs with total wealth of 3 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.