Coronavirus In Maharashtra: राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 960 रुग्णांचा मृत्यू, तर आज 34 हजार नवे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 10:25 PM2021-05-15T22:25:40+5:302021-05-15T22:34:39+5:30

Coronavirus In Maharashtra: कोरोना मृत्यूंचा वाढता आकडा ही चिंतेची बाब बनली असून आज एकाच दिवशी 960 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोना मृत्यूंचा वाढता आकडा ही चिंतेची बाब बनली असून आज एकाच दिवशी 960 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

राज्यात आज 34,848 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण 4,94,032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक ९३,२४५ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात ३६,५६०, मुंबई पालिका क्षेत्रात 34,083, अहमदनगर जिल्ह्यात 30,221 तर ठाणे जिल्ह्यात 29,654 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 53,44,063 एवढी झाली आहे.आज 59,073 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजपर्यंत एकूण 47,67,053 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.2 टक्के इतके झाले आहे.

याचबरोबर,आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,08,39,404 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53,44,063 (17.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 34,47,653 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28,727 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईतआज दिवसभरात 2 हजार 333 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आतापर्यंत एकूण 6 लाख 34 हजार 315 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत 36 हजार 674 रुग्ण सक्रिय आहे. मुंबईत शनिवारी 1 हजार 447 रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन बाधितांचा आकडा वेगाने खाली येताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या 70 हजारांच्या घरात पोहोचली होती. त्यात मे महिन्यात सातत्याने घसरण पाहायला मिळाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊनही 1 जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे.