शिंदे गटालाच धक्का देण्याची भाजपाची तयारी?; केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 08:46 PM2022-08-23T20:46:43+5:302022-08-23T20:49:36+5:30

अलीकडेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाण्यात एक विधान केले. त्यावरून शिंदे गटातील खासदार नाराज झाले होते. बुलढाण्यात कमळ चिन्हावरील खासदार निवडून आणून २०२४ मध्ये नरेंद्र मोदींचे हात बळकट करा असं आवाहन बावनकुळेंनी केले होते. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बावनकुळेंना वरिष्ठांनी समज द्यावी असं म्हटलं होतं.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लोकसभेच्या १२ शिवसेना खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. परंतु आता या १२ जणांच्या हक्काच्या मतदारसंघात कमळ फुलवण्याची योजना भाजपाकडून सुरू झाली आहे. या मिशनची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली आहे. त्यात साताऱ्यासह, कोल्हापूर, हातकणंगले जागांचाही समावेश आहे.

मागील काही दिवसांपासून केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री सत्यपाल सिंह बघेल पश्चिम महाराष्ट्रात मुक्काम ठोकून आहेत. राज्यात मिशन भाजपा अंतर्गत ४० हून अधिक खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.

सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचे १८ खासदार आहेत परंतु त्यातील १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेत. आगामी निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपा एकत्रित लढवणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र कमळ चिन्हावर जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजपा नेत्यांनी रणनीती आखली आहे.

कोल्हापूरात संजय मंडलिक, धैर्यशील माने हे खासदार शिंदे गटात सहभागी झालेत. त्यामुळे आगामी काळात याठिकाणी शिंदे गटाचेच उमेदवार असतील असं ग्राह्य धरलं जात आहे. परंतु भाजपानं या मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न केलेत. त्याचीच चाचपणी केंद्रीय राज्यमंत्री करत आहेत. त्यामुळे इतरांच्या मतदारसंघातही हा धोका निर्माण झाला आहे.

शिंदे यांच्यासह विधानसभेतील ४० आणि लोकसभेतील १२ खासदारांनी शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारलं आहे. शिंदे यांनी भाजपासोबत हात मिळवणी करत खरी शिवसेना आम्हीच आहोत असा दावा केला आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टासह केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रश्न प्रलंबित आहे

दोन्ही गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. बहुमताच्या आधारे आम्हालाच धनुष्यबाण चिन्ह द्यावं असा दावा शिंदे गटाने केला आहे. परंतु सुप्रीम कोर्टात न्याय प्रविष्ट बाब असल्याने खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न अद्यापतरी अनुत्तरीत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले असून, त्यासाठी आगामी १८ महिन्यांत एक मिशन राबविले जाणार आहे. शिवसेनेकडे असलेल्या १० जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.

ज्या जागा जिंकल्या आहेत, त्यावर आमचं लक्ष आहेच. मात्र, ज्या जागा जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही अधिक लक्ष देणार असल्याची माहिती फडणवीस यांनी पत्र परिषदेत दिली होती. केंद्रातील काही मंत्री या मिशन अंतर्गत राज्यात दौरे करणार असून, त्यात भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, आदींचा समावेश असेल असे त्यांनी सांगितले होते.

शिवसेनेचे हे मतदारसंघ रडारवर असल्याची माहिती आहे. बुलडाणा- प्रतापराव जाधव, हिंगोली- हेमंत पाटील, पालघर- राजेंद्र गावित, कल्याण- श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे, दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, शिर्डी- सदाशिव लोखंडे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- विनायक राऊत, कोल्हापूर- संजय मंडलिक, हातकणंगले- धैर्यशील माने.