कोकणवासीयांना गुड न्यूज! कोकण रेल्वेचा कायापालट होणार, दुपदरीकरणावर भर; प्रवासी ट्रेन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 09:19 IST2026-02-04T09:00:44+5:302026-02-04T09:19:27+5:30

Konkan Railway Development News: कोकण रेल्वेच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी ५१५ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

Konkan Railway Development News: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार ९२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रकल्पांसाठीची अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती दिली. राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्पांचे काम सुरू आहे. यात दुहेरीकरण, चौपदरीकरण अशा मार्गांचा समावेश आहे.

मुंबई-कोकण मार्गासह संपूर्ण कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, तो मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. यात बोगद्यांचे मजबुतीकरण, रुळांचे अद्यावतीकरण यांसह अन्य तांत्रिक कामांचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने होणारे दुहेरीकरण पूर्ण झाल्यावर कोकण रेल्वेवरील प्रवासी ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार आहे.

कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी आणि संपूर्ण कोंकण किनारपट्टीसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वेच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी ५१५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची घोषणा केली आहे.

या भरीव निधीमुळे कोंकण रेल्वेच्या आधुनिकीकरणाला मोठी गती मिळणार असून, या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोंकण रेल्वेच्या विकासासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची घोषणा केली. कोंकण रेल्वे ही केवळ एक रेल्वे मार्ग नसून देशाच्या संपूर्ण किनारपट्टी भागाला जोडणारी एक महत्त्वाची जीवनवाहिनी आहे.

वाढती प्रवासी संख्या आणि मालवाहतूक लक्षात घेता, या मार्गाची क्षमता वाढवणे ही काळाची गरज बनली आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कॉन्फरन्समध्ये कोंकण रेल्वे (कारवार) भागाच्या प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक आशा शेट्टी, कोंकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोंकण रेल्वेच्या महत्त्वाच्या रेल्वे मंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, विभागांचे दुपदरीकरण करण्यासाठी आणि रेल्वे सुधारणेसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल आता पूर्ण झाला आहे. सध्या हा अहवाल मंजुरीच्या प्रक्रियेत असून, त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाईल.

कोंकण रेल्वेचा मार्ग भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. त्यामुळेच, या मार्गावरील बोगद्यांचे मजबुतीकरण आणि ट्रॅकच्या जुन्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाणार आहे. ५१५ कोटींच्या या अर्थसंकल्पामुळे कोंकण रेल्वेची क्षमता तर वाढेलच, पण त्याचबरोबर किनारपट्टी भागातील जोडणीमध्ये मोठी सुधारणा होईल.

या नवीन अर्थसंकल्पात केवळ विस्तारावरच नाही, तर सुरक्षिततेवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. रेल्वे अपघात रोखण्यासाठी 'कवच' ही सुरक्षा प्रणाली कोंकण रेल्वेवर कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

सध्या महाराष्ट्रात एक लाख ७० हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. देशातील सर्वात मोठे आयटी हब म्हणून ओळखले जाणारे पुणे आणि हैदराबाद ही दोन्ही शहरे हाय स्पीड रेल्वेने जोडली जाणार आहेत, असे रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांनी सांगितले.

कोकण रेल्वेला 'कवच' आणि दुहेरी करणालाही मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई-गोवा या कोकण मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर नव्या तंत्रज्ञानावर आधारित 'कवच' सुरक्षा प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास निर्धोक होईल, असेही रेल्वेमंत्री म्हणाले.

सर्वात मोठ्या बंदरांपैकी वाढवण बंदर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी जोडले जाणार आहे. १३२ रेल्वे स्थानकांची उभारणी केली जात आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त गाड्या, स्टेशन विकास, प्रवासी सुविधांवर भर देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७पर्यंत सुरू होणार आहे. ती गुजरातमध्ये पहिल्यांदा धावणार आहे. सुरुवातीला १ ते २ तासांच्या अंतराने आणि मागणी वाढल्यास पीक अवरमध्ये १५ मिनिटांत एक ट्रेन चालवली जाऊ शकते. तिकीटदर सर्वसामान्यांना परवडणारे असतील, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.