सुनेत्रा पवार यांची तातडीने उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय का घेतला गेला? ही आहेत ५ कारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 14:06 IST2026-01-31T14:01:20+5:302026-01-31T14:06:02+5:30
Sunetra Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे राज्याचं राजकारण हादरून गेलं आहे. तसेच अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबात आणि त्यांच्या पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे अजितदादांच्या जाण्याचं दु:ख असतानात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षाने उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने घेतला आहे. या निर्णयावरून पवार कुटुंबात आणि महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय का घेतला याचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे राज्याचं राजकारण हादरून गेलं आहे. तसेच अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबात आणि त्यांच्या पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे अजितदादांच्या जाण्याचं दु:ख असतानात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षाने उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने घेतला आहे. या निर्णयावरून पवार कुटुंबात आणि महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्याचा निर्णय का घेतला याचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात.

पक्षातील निर्नायकी संपवणे
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजितदादा हेच या पक्षाचे सर्वेसर्वा असल्याने त्यांच्या जाण्याने पक्षात निर्नायकी निर्माण झाली होती. तसेच समोर नेतृत्वच नसल्याने पक्षातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता होती. त्यात पक्षात फूट पडण्याची आणि काही नेते व आमदार इतर पक्षात जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा परिस्थिती पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी सर्वांची स्वीकारार्हता असेल अशा व्यक्तीकडे पक्षाचं नेतृत्व तातडीने सोपवण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामधून सर्वमान्य होईल असा चेहरा म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

पक्षांतर्गत स्पर्धा थोपवणे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षांतर्गत निर्माण होऊ शकणारी स्पर्धा रोखणे हे सुनेत्रा पवार यांचीच उपमुख्यमंत्रिपदी निवड करण्यामागचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, वळसे पाटील यांच्यासह अनेक प्रभावी नेते आहेत. मात्र दादांच्या पश्चात यांच्यापैकी एखाद्या नेत्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली असती तर पक्षात नेतृत्वासाठी स्पर्धा निर्माण होऊन त्यामधून नेत्यांमध्ये शह काटशहामधून तीव्र मतभेद उद्भवले असते. मात्र सुनेत्रा पवार या अजितदादांच्या पत्नी असल्याने त्यांच्या निवडीला पक्षातून आव्हान मिळण्याची शक्यता जवळपास नाही आहे. त्यामुळेच या कठीण प्रसंगी त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला गेला.

बारामतीच्या राजकारणावर पकड मिळवणे
सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचं तिसरं कारण म्हणजे अजितदादा आणि त्यांच्या पक्षाचं बलस्थान आणि ओखळ ही बारामती मतदारसंघ राहिलेला आहे. दादांच्या अकाली जाण्यामुळे आता बारामतीमध्ये नेतृत्व कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवल्याने अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्या लढतीत आणि ही जागा अजितदादांच्या कुटुंबीयांकडेच राहील, हे या निवडीमधून निश्चित करण्यात आलं आहे.

सहानुभूतीचा फायदा आणि पवार कुटुंबाकडेच नेतृत्व
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे अजित पवार यांच्या कुटुंबीयांबाबत मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांकडे नेतृत्व सोपवल्यास त्याचा फायदा पक्षाला होईल ही बाब अजित पवार गटातील नेत्यांना ठावूक होती. त्यामुळे अजित पवार यांच्या कुटुंबीयांमधील पार्थ पवार, जय पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्यापैकी कुणाकडे तरी नेतृत्व सोपवणं योग्य ठरलं असतं. त्यात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांना अद्याप पुरेसा राजकीय अनुभव नसल्याने त्यांच्याकडे नेतृत्व सोपवणं व्यवहार्य ठरलं नसतं. त्याऐवजी सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवणं योग्य ठरेल, असा विचार करून पक्षातील धुरिणांनी सुनेत्रा पवार नावावर शिक्कामोर्तब केले.

महिला चेहरा
याबरोबरच सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवून पक्षाने आपलं महिला धोरणही अधोरेखित केलं आहे. सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यामधून पक्षाबाबत जनमानसामध्ये सकारात्मक संदेश जाणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपवण्याचा निर्णय घेतला गेला.

















