CoronaVirus News: ...तर पुढील २ आठवड्यांत कोरोनामुळे रोज १ हजार जणांचा बळी; महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 06:50 PM2021-03-25T18:50:10+5:302021-03-25T18:53:25+5:30

1000 Deaths a Day In Next 2 Weeks Maharashtra Health Dept Predicts: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ; पुढील दोन आठवड्यांत धोका वाढणार

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. एका बाजूला कोरोना लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूला कोरोनाचा संसर्गदेखील वेगानं होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल देशातल्या सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली. त्यातल्या पहिल्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिल्यास पुढील दोन आठवडे धोक्याचे असतील, असा गंभीर इशारा आरोग्य विभागानं दिला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेतल्यास अनेक जिल्ह्यांत वैद्यकीय सुविधा कमी पडू शकतील, अशी भीती राज्याच्या आरोग्य विभागानं वर्तवली आहे.

सध्याच्या घडीला पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. जिल्ह्यात सध्या ६१ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यानंतर नागपूर, मुंबईचा क्रमांक लागतो. येत्या काही दिवसांत नागपूर आणि ठाण्यातील परिस्थिती भीषण असेल, असा इशारा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.

पुढील ११ दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ६४ हजारांच्यावर जाऊ शकतो, अशी भीती आरोग्य विभागानं वर्तवली आहे.

सध्याच्या घडीला कोरोना प्रादुर्भाव वाढण्याचं प्रमाण आठवड्याला १ टक्का इतकं आहे. सध्या राज्यातलं कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण २.२७ टक्के इतकं आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २५ लाख ६४ हजार ८८१ इतकी आहे. मृत्यूचा दर २.२७ टक्के असल्यानं पुढील २ आठवड्यांत दर दिवशी १ हजार जणांचा मृत्यू होऊ शकतो, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

देशभरात उपचार घेत असलेल्या एकूण कोरोना रुग्णांचा विचार केल्यास त्यातले ४१ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. पैकी ८ टक्के रुग्णांची स्थिी गंभीर आहे.

राज्यात काल दिवसभरात कोरोनाच्या ३१ हजार ८५५ नव्या रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्ण वाढ आहे. सध्याच्या घडीला राज्यात २ लाख ४७ हजार २९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.