भीषण, भयंकर, भयावह! सर्वच जळून खाक; फटाक्यांच्या फॅक्ट्रीतील स्फोटाचे थरकाप उडवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 04:33 PM2024-02-06T16:33:51+5:302024-02-06T16:41:09+5:30

Harda Blast: फटाक्यांच्या फॅक्ट्रीत भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 74 जण जखमी झाले आहेत.

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एका फटाक्यांच्या फॅक्ट्रीत भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 74 जण जखमी झाले आहेत. या फॅक्ट्रीत अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बचाव कार्यात गुंतलेल्या पथकांना रस्त्यावर खराब झालेली वाहनं आणि मृतदेह आढळले. याशिवाय अनेक जखमी लोक रडताना दिसत आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.

स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण परिसर जळून खाक झाला. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 74 जण भाजले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातून एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम हरदा येथे पोहोचत आहेत.

नर्मदापुरम आणि आसपासच्या भागातून 14 डॉक्टरांना तातडीने हरदा येथे पाठवण्यात आले आहे. हरदा येथे 20 रुग्णवाहिका हजर असून आणखी 50 रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

भोपाळ, इंदूर बैतुल, नर्मदापुरम, भेरुंडा, रेहती आणि इतर शहरी संस्था आणि संस्थांमधून अग्निशमन दल हरदा येथे पाठवले जात आहे. स्फोटाच्या तीव्रतेने आजूबाजूची घरे हादरली. कारखान्याची इमारत पूर्णपणे कोसळली.

हरदा येथील बैरागड भागातील आजूबाजूच्या घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. या भागात गच्चीवर बेकायदेशीरपणे फटाके बनवले जातात. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. फटाके ठेवण्यात आल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात विलंब होत आहे, त्यामुळे आग सतत भडकत आहे.

या जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं आहे. गंभीर जखमींना भोपाळ आणि इंदूरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. याशिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही सरकार उचलणार आहे. या घटनेने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (सर्व फोटो - आजतक)