का आजपर्यंत कुणीच कैलाश पर्वत सर करू शकलं नाही? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 12:07 PM2022-09-13T12:07:43+5:302022-09-13T12:23:28+5:30

Kailas Parvat : कैलास पर्वत आजपर्यंत कुणी सर करू शकलं नाही. याची उंची ६६३८ मीटर इतकी आहे. माउंट एव्हरेस्टपेक्षा ही उंची कमी असूनही कैलास पर्वत कुणी सर केला नाही, हे रहस्यच आहे.

हिंदू धर्मात कैलास पर्वताला फार महत्व आहे. कारण अशी मान्यता आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिवा राहतात. पण या पर्वताबाबत आणखी एक आश्चर्याची बाब आहे. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट आतापर्यंत ७ हजारपेक्षा अधिक लोकांनी सर केलं आहे. यांची उंची ८८४८ इतकी आहे. पण कैलास पर्वत आजपर्यंत कुणी सर करू शकलं नाही. याची उंची ६६३८ मीटर इतकी आहे. माउंट एव्हरेस्टपेक्षा ही उंची कमी असूनही कैलास पर्वत कुणी सर केला नाही, हे रहस्यच आहे.

कैलास पर्वतावर कधी कुणीही चढाई न करण्यावरून अनेक कथा प्रचलित आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिव राहतात आणि त्यामुळे इथे कोणतीही जिवंत व्यक्ती जाऊ शकत नाही. असे मानले जाते की, कैलाश पर्वतावर थोडं वर चढल्यावर व्यक्ती दिशाहीन होते. दिशा कळत नसताना चढाई करणे मरणाला निमंत्रण देण्यासारखंच आहे. त्यामुळेच आजपर्यंत कुणी कैलास पर्वतावर चढू शकलं नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका गिर्यारोहकाने त्याच्या पुस्तकात लिहिले होते की, त्याने कैलास पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला होता. पण या पर्वतावर राहणं अशक्य होतं. कारण इथे शरीरावरील केस आणि नखे वेगाने वाढू लागतात. त्यासोबतच कैलास पर्वतावर फार जास्त रेडिओअॅक्टिवही आहे.

त्यासोबतच असेही म्हटले जाते की, कैलास पर्वताचा स्लोप सुद्धा ६५ डिग्रीपेक्षा जास्त आहे. माउंट एव्हरेस्टचा हाच स्लोप ४०-६० असा आहे. हेच कारण आहे की, गिर्यारोहक माउंट एव्हरेस्टवर सहजपणे चढाई करू शकतात, पण कैलास पर्वतावर करू शकत नाहीत.

रशियातील एक गिर्यारोहक सरगे सिस्टीयाकोव यांनी सांगितले की, 'जेव्हा मी कैलास पर्वताच्याजवळ गेलो तेव्हा माझं हृदय वेगाने धडधडत होतं. मी त्या पर्वताच्या अगदी समोर होतो, ज्यावर आजपर्यंत कुणीही चढाई करू शकले नाहीत. पण मला अचानक कमजोरी वाटू लागली आणि माझ्या मनात विचार आला की, मी इथे थांबू नये. त्यानंतर जसजसा मी खाली उतरत गेलो, माझं मन हलकं होत गेलं'.

कैलास पर्वतावर चढाई करण्याचा शेवटचा प्रयत्न जवळपास १८ वर्षांआधी म्हणजे २००१ मध्ये केला गेला होता. तेव्हा चीनने स्पेनच्या एका टीमला कैलास पर्वतावर चढाई करण्याची परवानगी दिली होती. सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. कारण भारत आणि तिबेटसहीत जगभरातील लोकांचं मत आहे की, हे एक पवित्र ठिकाण आहे. त्यामुळे यावर कुणालाही चढाई करू देऊ नये.

दरम्यान, असे म्हणतात की, ९२ वर्षांआधी म्हणजेच १९२८ साली एक बौद्ध भिक्खु मिलारेपा कैलास पर्वातावर चढाई करण्यात यशस्वी ठरले होते. तसेच ते या पर्वतावर जाऊन जिवंत परत येणारे जगातले पहिले व्यक्ती होते. याचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो.