Plane Crashed: पायलटने विमानात सिगारेट पेटवताच उडाला आगीचा भडका, अपघातात 66 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 03:44 PM2022-04-27T15:44:59+5:302022-04-27T15:52:57+5:30

Plane Crashed: 2016 मध्ये एका विमान अपघातात 66 जणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताचे नेमके कारण आता समोर आले आहे.

एका सिगारेटने किती मोठा अपघात घडू शकतो, याचा प्रत्यय फ्रान्समध्ये घडलेल्या या घटनेतून येईल. पायलटने सिगारेट ओढल्याने विमानातील सर्व 66 जणांचा मृत्यू झाला. तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या इमर्जन्सी मास्कमधून ऑक्सिजन गळती सुरू होती, तेवढ्यात पायलटने सिगारेट पेटवली आणि कॉकपिटमध्ये आग लागली.

सविस्तर माहिती अशी की, फ्रान्समधील पॅरिस चार्ल्स डी गॉल विमानतळावरून कैरो (इजिप्तची राजधानी) येथे जाणारे एअरबस A320 मे 2016 मध्ये क्रॅश झाले होते.

हे विमान गूढ परिस्थितीत भूमध्य समुद्रात(Mediterranean Sea) पडले होते. मृतांमध्ये 1 ब्रिटिश, 12 फ्रेंच पर्यटक, 30 इजिप्शियन, 2 इराकी आणि कॅनडाचे नागरिक होते.

अपघातानंतर याचे कारण जाणून घेण्यासाठी विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा मोठ्या प्रमाणावर शोध घेण्यात आला होता. अखेर ब्लॅक बॉक्स अमेरिकन नौदलाच्या हाती लागला.

हा ब्लॅक बॉक्स ग्रीसजवळील खोल पाण्यात पडला होता. त्यावेळेस इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी विमान अपघातामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा दावा केला होता.

मात्र, आता अधिकृत तपासात पायलट मोहम्मद सईद अली शौकैर यांच्या धूम्रपानामुळे हा अपघात झाल्याची पुष्टी झाली आहे. एव्हिएशन एक्सपर्ट्सच्या 134 पानांच्या अहवालात म्हटले आहे की, शौकेर यांनी कॉकपिटमध्ये सिगारेट ओढल्यामुळे अपघात झाला. विशेष म्हणजे 2016 च्या अपघाताच्या वेळी विमानात सिगारेट ओढण्यावर बंदी नव्हती.

इटालियन वृत्तपत्र Corriere Della Sera शी केलेल्या संभाषणात तज्ञांनी सांगितले की, मेंटेनान्स इंजीनियरने ऑक्सिजन मास्क नॉर्मलवरुन इमर्जंसीवर शिफ्ट केला होता.

त्यामुळे ऑक्सिजनची गळती सुरू झाली. रिपोर्टनुसार, 19 मे 2016 रोजी पहाटे 2.25 वाजता ऑक्सिजन गळती सुरू झाली आणि त्याच्या काही मिनिटांनी विमान क्रॅश झाले.