16 हजार एकर जमीन, 38 विमाने, 300 कार, 52 सोन्याच्या बोटी; इतका श्रीमंत आहे 'हा' राजा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 04:54 PM2023-07-30T16:54:18+5:302023-07-30T16:59:23+5:30

थायलंडचे राजघराणे दरवर्षी त्यांच्या गाड्या आणि विमानाच्या पेट्रोलवर 524 कोटी खर्च करतात.

Thailand’s King Maha Vajiralongkorn: जेव्हा आपण परदेशी राजघराण्यांचा उल्लेख करतो तेव्हा ब्रिटनचे राजघराणे, ब्रुनेईचा सुलतान, सौदीच्या राजघराण्यासह इतर अनेक राजघराण्यांचा उल्लेख येतो. आज आम्ही तुम्हाला जगातील आणखी एका श्रीमंत राजाबद्दल सांगणार आहोत. या राजाकडे 3.2 लाख कोटींची संपत्ती आहे. हा राजा राजेशाही आणि विलासी जीवन जगतो.

या राजाचे नाव थायलंडचा राजा रामा X आहे. त्यांचे खरे नाव राजा महा वजिरालोंगकॉर्न आहे. फायनान्शिअल टाईम्सच्या मते, थायलंडच्या राजघराण्याची संपत्ती 40 अब्ज डॉलर्स म्हणजेच 3.2 लाख कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत राजांमध्ये केली जाते. त्यांच्याकडे 38 विमानांसह शेकडो महागड्या गाड्या आहेत. यावरुनच त्या राजाच्या श्रीमंतीचा अंदाज लावता येतो.

थायलंडचे राजा महा वजिरालोंगकॉर्न यांची सर्वात मोठी संपत्ती देशभर पसरलेली जमीन आहे. किंग रामा एक्स यांच्याकडे थायलंडमध्ये 6,560 हेक्टर (16,210 एकर) जमीन आहे, ज्यामध्ये राजधानी बँकॉकमधील 17,000 करारांसह देशभरात 40,000 भाडे करार आहेत. या जमिनींवर मॉल, हॉटेलसह अनेक सरकारी इमारती आहेत.

राजा महा वजिरालोंगकॉर्न यांच्याकडे थायलंडची दुसरी सर्वात मोठी बँक, सियाम कमर्शियल बँकेत 23 टक्के आणि देशातील सर्वात मोठी औद्योगिक समूह, सियाम सिमेंट समूहातील 33.3 टक्के हिस्सेदारी असल्याचे सांगितले जाते.

थायलंडच्या राजाच्या मुकुटातील रत्नांपैकी एक 545.67-कॅरेट तपकिरी गोल्डन ज्युबिली हिरा आहे, जो जगातील सर्वात मोठा आणि सर्वात महागडा हिरा आहे. डायमंड अथॉरिटीने त्याची किंमत 98 कोटी रुपयांपर्यंत वर्तवली आहे.

फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, थायलंडच्या राजाकडे 21 हेलिकॉप्टरसह 38 विमाने आहेत. यामध्ये बोईंग, एअरबस विमान आणि सुखोई सुपरजेट यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे विमानाच्या इंधन आणि देखभालीवर दरवर्षी 524 कोटी रुपये खर्च केले जातात.

थायलंडच्या राजाकडे अनेक महागड्या गाड्या आहेत, ज्यामध्ये लिमोझिन, मर्सिडीज बेंझसह 300 हून अधिक कारचा समावेश आहे. याशिवाय रॉयल बोट हे राजघराण्याचे सर्वात जुने चिन्ह आहे. रॉयल बोटीसोबत 52 बोटींचा ताफा फिरतो. सर्व बोटींवर सोन्याचे नक्षीकाम आहे, त्यांना सुफानाहोंग म्हणतात.

ग्रँड पॅलेस हा थायलंडच्या राजाचा शाही राजवाडा आहे, जो 23,51,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. हा राजवाडा 1782 मध्ये बांधण्यात आला होता. पण, राजा राम X राजवाड्यात राहत नाही. या महालात अनेक सरकारी कार्यालये आणि संग्रहालये आहेत.