ना कुठली जोखीम, ना पोलिसांचं टेन्शन...आता लेट नाइट पार्टीनंतर VVIP सारखं घरी जाऊ शकता, कसं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:38 IST2026-01-09T16:30:19+5:302026-01-09T16:38:04+5:30

सध्याच्या काळात भारतीय युवकांमध्ये पार्टी कल्चर आणि नाइटलाइफचा क्रेझ खूप वाढला आहे. कायम वीकेंडला अथवा एखाद्या खास क्षणावेळी पार्टी मूडमध्ये असणारे युवांचे व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात. त्यात नशेच्या अवस्थेतही बऱ्याच घटना घडतात.

दारू पिऊन केलेली एक मजेदार रात्र कधी भयानक अपघातात बदलेल, पोलिसांचा मोठा दंड लागेल किंवा तुम्ही कधीही विसरणार नाही अशी व्हायरल क्लिप कधी बनेल हे सांगणे कठीण आहे. सरळ चालता येत नाही, मित्रांकडून कसंबसं गाडीपर्यंत ओढत नेले जाते. अशा लाजिरवाण्या प्रसंगामुळे कोणत्याही आनंदावर विरजन पडते.

पण आता भारतात पार्टी लवर्ससाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. नशेत वाहन चालवण्याची जोखीम आणि अपघातापासून वाचण्यासाठी ड्राइवयू (DriveU) सारख्या प्लॅटफॉर्मने एक अशी सर्व्हिस सुरू केलीय, ज्यामुळे तुम्हाला तुमच्याच कारमधून एखाद्या व्हिआयपीसारखे सुरक्षितपणे घरी पोहचवले जाईल.

कुठून सुचली आयडिया? - ही सर्व्हिस सुरू करण्याची प्रेरणा चीनच्या एका जादुई मॉडेलपासून मिळाली. अलीकडेच चीनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला होता. ज्याकडे जगाचे लक्ष वेधले. त्यातून दारू पिऊन कार चालवण्याच्या समस्येचा तोडगा निघाला.

जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त दारू प्यायली असेल तर तुम्ही एका APP च्या माध्यमातून ड्रायव्हर बोलवू शकता. हा ड्रायव्हर त्याची फोल्डेबल सायकल घेऊन येतो. तो ती सायकल तुमच्या कारच्या डिक्कीमध्ये ठेवतो. त्यानंतर तुम्हाला घरापर्यंत सोडतो. विशेष म्हणजे तिथे ही सेवा विमाचा भाग म्हणून मोफत मिळते. चीनच्या धर्तीवर भारतातही सुरक्षेच्या दृष्टीने एक मजबूत जाळं तयार केले जात आहे. भारतात हे सुरुवातीच्या टप्प्यात आहे परंतु बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार येणाऱ्या काळात ही फक्त एक सुविधा राहणार नाही तर वेळेची गरज बनणार आहे.

भारतातील रस्ते अपघातामुळे याठिकाणी हजारो जीव दरवर्षी जात असतात. DriveU चे संस्थापक रहम शास्त्री यांनी याची आकडेवारी सांगितली. २०२४ मध्ये भारतात रस्ते अपघातात १.५ लाखाहून अधिक लोकांचा जीव गेला. त्यातील बरेच अपघात केवळ नशेच्या कारणाने नाही तर थकवा आणि झोपेच्या कमतरतेमुळे झाले आहेत.

हे अपघात रोखण्यासाठी केवळ कठोर नियमांची आवश्यकता नाही तर त्यासाठी विश्वासदायक पर्यायही उपलब्ध करून दिले पाहिजे. जर एक बटण दाबताच प्रोफेशनल आणि विश्वासू ड्रायव्हर त्यांच्याकडे येईल हे लोकांना माहिती असेल तर ते पर्याय शोधणे आणि ड्रायव्हिंग इतरांकडे सोपवू शकतात असं शास्त्री यांनी सांगितले. Drive U ने भारतात चीनसारखे ऑन डिमांड ड्रायव्हर प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. सध्या बंगळुरू, मुंबई, दिल्ली एनसीआर, कोलकाता, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोयंबटूर आणि मदुरैसारख्या १० प्रमुख शहरात ही सेवा सुरू केली आहे. त्यात कंपनीने दारू पिऊन वाहन चालवू नका या नावाने विशेष राइड पर्याय दिला आहे.

ही सेवा सध्या युवकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. कंपनीला मिळणाऱ्या बुकिंगपैकी बहुतांश ग्राहक हे दारू पिऊन कार चालवण्याची जोखीम न उचलणाऱ्यांपैकी आहेत. २८ ते ५५ वयोगटातील लोकांचा यात समावेश आहे. हा तो वर्ग आहे जे सामाजिकदृष्ट्या रस्ते सुरक्षा आणि आपली जबाबदारी यांच्याप्रती जागरूक झाले आहेत.

केवळ मद्यपान करून धोका गाडी चालवण्यापुरते मर्यादित नाही. तर एखादा मद्यधुंद पुरुष किंवा महिला रात्रीच्या वेळी अडकून पडला किंवा असुरक्षित पर्याय निवडण्यास भाग पाडले गेले तर त्यांच्यावर हल्ला, दरोडा किंवा छळ होण्याचा धोका वाढतो. सत्यापित व्यावसायिक ड्रायव्हर असणे हा समाधानकारक उपाय आहे. जेव्हा देखरेख कडक असते आणि लोकांना व्यावसायिक ड्रायव्हर्ससारखे सुरक्षित पर्याय उपलब्ध असतात तेव्हा रात्रीच्या वेळी अपघातांमध्ये १७% आणि मृत्यूंमध्ये २५-३०% लक्षणीय घट होते हे एका अभ्यासातून समोर आले आहे.

दारू पिणे आता बंद खोल्यांपर्यंत मर्यादित राहिलेले नाही ते समारंभ आणि डिनर पार्टीचा एक नियमित भाग बनले आहे. ही समस्या सुरक्षिततेबद्दल जाणीव नसून सोयी आणि विश्वासाचा अभाव आहे. जेव्हा एखादा प्लॅटफॉर्म सत्यापित ड्रायव्हर्स, लाईव्ह ट्रॅकिंग आणि त्वरित मदत यासारखी सुविधा प्रदान करतो, तेव्हा रात्रीच्या सेलिब्रेशननंतर ड्रायव्हर बुक करणे हा एक बॅकअप प्लॅन बनतो.
















