कुठे आहे येशू ख्रिस्तांचा तो 'चमत्कारी ग्लास'? ज्याचा हजारो वर्षांपासून सुरू आहे शोध!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 02:50 PM2020-02-15T14:50:49+5:302020-02-15T14:58:38+5:30

जगात प्रत्येक धर्माशी निगडीत अनेक किस्से-आख्यायिका आहेत. काही पवित्र वस्तूंबाबत तर त्या त्या धर्माचे अनुयायी क्रेझी असतात. अशीच एक पवित्र वस्तू आहे 'द होली ग्रेल'.

ख्रिश्चन धर्माच्या वेगवेगळ्या आख्यायिकांमध्ये तुम्ही कधीना कधी 'द लास्ट सपर' चा उल्लेख नक्कीच ऐकला असेल. द होली ग्रेल म्हणजे येशु ख्रिस्तांनी जेवताना वापरलेला ग्लास आहे.

ख्रिश्चन धर्माच्या मान्यतेनुसार, होली ग्रेल हा एक जादुई ग्लास आहे. ज्याचा वापर करणारा व्यक्ती अमर होतो. या ग्लासबाबत अनेक कथा-किस्से आणि दावे केले जाते. जगातल्या जवळपास सर्वच चर्चमध्ये ग्लास ठेवलेला दिसेल आणि सगळेच तो खरा असल्याचा दावा करतात. एकट्या यूरोपमध्ये २०० ठिकाणी हा दावा केला जातो की, त्यांच्याकडे जो ग्लास आहे तोच खरा होली ग्रेल आहे.

खरा ग्लास असल्याचा दावा करणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे स्पेनमधील वॅलेंसिया शहर. हे शहर फार जुनं आणि मोठं आहे. येथील एका जुन्या चर्चने त्यांच्याकडे होली ग्रेल असल्याचा दावा केला आहे. आजही या ग्लासाचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून लोक इथे येतात.

होली ग्रेलचा सर्वात पहिला उल्लेख ब्रिटनचे राजा किंग ऑर्थर यांच्याशी संबंधित काही गोष्टींमध्ये आला होता. राजा ऑर्थर आणि त्यांच्या सेनेची महानता सांगणाऱ्या महाकाव्यात फ्रेन्च कवींनी होली ग्रेलचा उल्लेख केला होता. प्राचीन काळात फ्रान्समधील दोन मोठ्या कवींनी सुद्धा त्यांच्या कवितांमध्ये राजा ऑर्थरच्या कथा वाढवून लिहिल्या.

असे मानले जाते की, येशु ख्रिस्तांचा शेवटच्या जेवणाचा किस्सा जेरूसलेममध्ये घडला होता. तर मग हा पवित्र ग्लास स्पेनपर्यंत कसा पोहोचला? असे सांगितले जाते की, दोन हजार वर्षांपूर्वी रोमचे पहिले पोप सेंट पीटर ग्लास सर्वातआधी जेरूसलेमहून रोमला घेऊन आले होते आणि सेंट पीटर यांनी लोकांना सांगितले होते की, हाच होली ग्रेल आहे ज्याचा वापर येशु ख्रिस्तांनी आपल्या शेवटच्या जेवणावेळी केला होता.

ईसपू २५७ मध्ये जेव्हा रोमचा राजा वलेरियनने ख्रिश्चन लोकांना त्रास देणे सुरू केले तेव्हा हा पवित्र ग्लास स्पेनमधील शहर ह्यूस्काला सुरक्षित पाठवण्यात आला. इथे ग्लास अनेक वर्ष होता, पण आठव्या शतकात उमय्यद खलीफांच्या हल्ल्यानंतर हा ग्लास पुन्हा सुरक्षित स्थळी हलवण्यात आला.

अनेक वर्ष हा पवित्र ग्लास एक जागेहून दुसऱ्या जागेवर जात राहिला. पण या प्रवासाआधीच्या एक हजार वर्षांतील गोष्टी जाणून घेणं अवघड आहे. या ग्लासबाबतच्या अनेक कथा केवळ मौखिक रूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहिल्या. याबाबत काही लिखित साहित्य नाही. पण एक दस्तावेज आहे. ज्यात असा उल्लेख आहे की, १३९९ मध्ये ग्लासला स्पेनमधील एरागोनचे राजा किंग मार्टिनच्या समाधीचा भाग करण्यात आला होता.

कॅथेड्रल रेकॉर्डनुसार १४१६ मध्ये जेव्हा अल्फोंसने गादी सांभाळली तेव्हा किंग मार्टिनचा मकबरा वॅलेंसियाला हलवण्यात आला. ग्लासही सोबत नेला गेला. नंतर हा पवित्र ग्लास कॅथेड्रलकडे सोपवण्यात आला. नंतर अनेक लढायांमध्ये हा ग्लास लुटण्यात आला. पण १९३९ मध्ये पुन्हा हा ग्लास वॅलेंसिया कॅथेड्रलला सोपवण्यात आला.

पण जे चर्च खरा होली ग्रेल असण्याचा दावा करतात त्यांच्याकडे तो ग्लास खरा असल्याचा पुरावा देण्यासाठी अनेक कथा-किस्से आहेत. पण वॅलेंसियातील चर्चमध्ये होली ग्रेल खरा असण्याचा दावा जास्त मजबूत वाटतो. स्पेनचे पुरातत्ववादी एंतोनियो बेलट्रन यांनी या पवित्र ग्लासाचा अभ्यास केला होता. त्यांच्यानुसार, गोमेद दगडापासून तयार हा ग्लास पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील आहे. हा ग्लास मध्य आशियात तयार करण्यात आलाय.

२०१४ मध्ये इतिहासकारांनी 'किंग ऑफ द ग्रेल' नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. ज्यात उत्तर स्पेनमधील बेसिलिका ऑफ सेन इसीडोरो ऑफ लिओन चर्चमध्ये खरा होली ग्रे असण्याचा दावा केला आहे. या इतिहासकारांनी केलेला हा दावा नुकत्याच मिळालेल्या प्राचीन मिस्त्र हस्तलिपीवर आधारित आहे. वॅलेंसिया चर्चप्रमाणेच त्यांच्याकडेही आपल्या तर्काच्या समर्थनात अनेक कथा आहेत. पण या इतिहासकारांचा दावा आहे की, ते वॅलेंसियामध्ये होली ग्रेल किंवा पवित्र ग्लास असण्याचा दावा नाकारतात.

सध्या पवित्र ग्लासाबाबत अनेक दावे आणि कथा आहेत. पण त्याबाबत ठोस पुरावे अजूनही रहस्य बनून आहेत. या ग्लासापेक्षा रोमांचक त्याच्या कथा आहेत. खरा होली ग्रेल कुणाला मिळेल किंवा नाही हे सांगणं कठिण आहे. पण त्यासंबंधी अनेक कथा आणि त्याचा शोध नेहमी सुरूच राहणार आहे.