तुमचा मृत्यू कधी होणार हे आता केवळ डोळ्यांत पाहून कळणार! आश्चर्यकारक तंत्रज्ञान विकसित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 05:21 PM2022-01-21T17:21:39+5:302022-01-21T17:25:40+5:30

Science News: डोळ्यांमध्ये पाहून प्रेम, राग, द्वेश, आनंद, भीती या भावना दिसू शकतात. मात्र डोळ्यांमध्ये पाहून आता त्या व्यक्तीचा मृत्यूही दिसू शकतो. तेसुद्धा त्या व्यक्तीचा मृत्यू होण्यापूर्वी अनेक वर्षे आधी कळू शकते.

डोळ्यांमध्ये पाहून प्रेम, राग, द्वेश, आनंद, भीती या भावना दिसू शकतात. मात्र डोळ्यांमध्ये पाहून आता त्या व्यक्तीचा मृत्यूही दिसू शकतो. तेसुद्धा त्या व्यक्तीचा मृत्यू होण्यापूर्वी अनेक वर्षे आधी कळू शकते. इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी एक असा अल्गोरिदम तयार केला आहे, हा अल्गोरिदम केवळ तुमच्या डोळ्याच्या रेटिना स्कॅन करून तुमचा मृत्यू किती दिवस, महिने आणि वर्षांत होणार हे समजू शकते.

युनायटेड किंग्डममध्ये साडे तीन वर्षांपूर्वी ४७ हजार लोकांवर या अल्गोरिदमचे परीक्षण करण्यात आले होता. हे परीक्षण प्रौढ किंवा वृद्धांवर करण्यात आला. त्यापैकी १८७१ जणांचा मृत्यू झाला. तो मृत्यू हा अल्गोरिदमने सांगितलेल्या वेळेआधीच हे मृत्यू झाले. या व्यक्तींच्या डोळ्यांचे रेटिना हे त्यांच्या खऱ्या वयापेक्षा अधिक वृद्ध झाले होते.

कुठल्याही व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये पाहून त्यांच्या खऱ्या वयाचा शोध घेतला जाऊ शकतो. तसेच भविष्यात व्यक्तीची प्रकृती कशी राहील, याचीही माहिती घेतली जाऊ शकते. त्यासाठी इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी एक असा अल्गोरिदम तयार केला आहे. तो केवळ रेटिना तपासून तुमचा मृत्यू कधी होऊ शकतो हे सांगू शकतो.

समजा जर अल्गोरिदमने कुठल्याही व्यक्तीच्या रेटिनाचा तपास केला आणि तो त्याच्या खऱ्या वयापेक्षा त्याचे बायोलॉजिकल वय एक वर्ष अधिक असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूची शक्यता दोन टक्क्यांनी वाढते. तर हृदय आणि कँन्सरसारखे आजार असलेल्यांना वगळून इतरांमध्ये मृत्यूची शक्यता ३ टक्के एवढी होते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, याबाबतचा प्रयोग अद्याप सुरू आहे. मात्र जेवढ्या लोकांवर हा प्रयोग केलाय, त्यांच्यामध्ये ही भविष्यवाणी खरी ठरली आहे.

डोळ्यांचे रेटिना हे वाढत्या वयासोबत डॅमेज होत जातात, असे या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. डोळ्याचे रेटिना वाढत्या वयाबाबत संवेदनशील असतात. कारण डोळ्यांचे रेटिना हाच असा भाग असतो जिथे रक्ताच्या नलिका आणि नर्व्हस एकत्र दिसतात. त्यांना पाहणे सोपे असते. त्यामधून मेंदूच्या आरोग्याची योग्य माहिती मिळू शकते.

शास्त्रज्ञांच्या मते वाढत्या वयाबाबत माहिती मिळवण्याच्या इतरही काही पद्धती आहेत. त्यामध्ये न्यूरोइमेजिंग, डीएनए मिथाइलेशन क्लॉक किंवा ट्रांसक्रिप्टोम एजिंग क्लॉक यांचा समावेश आहे. मात्र हे सर्व रेटिनल एज गॅपप्रमाणे अचून नाही आहेत. त्यातील काही प्रक्रिया वेळखाऊ आहेत. तसेच काही वेदनादायीही आहेत. मात्र रेटिना स्कॅन करणे केवळ पाच मिनिटांचे काम आहे. तसेच त्यात वेदनाही होत नाहीत.