कोरनाच्या थैमानानं अमेरिका हादरली; एकाच दिवसात आढळले दीड लाखांवर रुग्ण; असा आहे मृतांचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 07:56 PM2021-09-04T19:56:32+5:302021-09-04T20:04:17+5:30

अमेरिकेत गेल्या सात दिवसांपासून रोज दीड लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत आणि अनेकांचे बळीही जात आहेत. या महामारीमुळे अमेरिकेत दर 55 सेकंदाला एक व्यक्तीचा मृत्यू होत आहे, यावरूनच तेथील परिस्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो.

जगातील सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. मात्र, असे असतानाही तेथे कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याचे नाव नाही. सध्या अमेरिका, रशिया आणि ब्राझीलसह अनेक देशांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने हाहाकार माजवला आहे. या व्हेरिएंटच्या उद्रेकामुळे अमेरिकेला मोठा फटका बसला आहे. (US Coronavirus havoc in America many died during one day know the condition of russia also)

आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत गेल्या सात दिवसांपासून रोज दीड लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत आणि अनेकांचे बळीही जात आहेत. या महामारीमुळे अमेरिकेत दर 55 सेकंदाला एक व्यक्तीचा मृत्यू होत आहे, यावरूनच तेथील परिस्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो.

अमेरिकेत एका दिवसात 1550 लोकांचा मृत्यू - अमेरिकन वृत्तपत्र 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार, 3 सप्टेंबरला अमेरिकेत तब्बल 163,667 नवे कोरोना बाधित समोर आले. तर 1550 जणांचा मृत्यू झाला. 'द वॉशिंग्टन पोस्ट' ने आपल्या वृत्तात म्हटले आहे, अमेरिका कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे त्रस्त झाली आहे. जुलैमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर, आता पुन्हा एकदा कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

याच बरोबर, आयएएनएस या वृत्तसंस्थेने शिन्हुआच्या वृत्ताचा हवाला देत, अमेरिकेत गेल्या सात दिवसांपासून संक्रमित रुग्णांची संख्या सरासरी 15,3246 नोंदविली जात असल्याचे म्हटले आहे.

टेक्सासमध्ये 27 हजारांहून अधिक विद्यार्थी संक्रमित - माध्यमांतील वृत्तांनुसार, टेक्सासमध्ये 27 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या हवाल्यानुसार, 29 ऑगस्टपर्यंत, टेक्सासमधील पब्लिक स्कूल्स कॅम्पसमध्ये 27,353 विद्यार्थी आणि 4,447 कर्मचारी कोरोना संक्रमित झाल्याची पुष्टी झाली आहे. म्हटले जाते, की राज्यातील शाळा सुरू झाल्यापासून गेल्या तीन आठवड्यांत विद्यार्थ्यांमध्ये संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

रुग्णालयात रोज 12,156 लोक होतायत दाखल - अमेरिकेत शनिवारी सकाळपर्यंत संक्रमित लोकांची संख्या 3,98,48,170 एवढी होती. तर साथीच्या आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या 6,47,573 होती. 25 ते 31 ऑगस्टदरम्यान रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या सरासरी 12,156 होती. हा आकडा गेल्या सात दिवसांच्या सरासरीपेक्षा 1.7 टक्क्यांनी अधिक आहे.

अमेरिकेत, एका आठवड्यात म्हणजेच सात दिवसांमध्ये कोरोनाने मरणारांचा सरासरी आकडा 1,047 एवढा नोंदवण्यात आला आहे. मागील सात दिवसांच्या तुलनेत हा आकडा 3.7 टक्क्यांनी अधिक आहे.

रशियातही 796 जणांचा मृत्यू - रशियालाही कोरोना विषाणूचा मोठा फटका बसला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रशियामध्ये गेल्या 24 तासांत 18,780 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 796 जणांचा मृत्यू झाला आहे. याच बरोबर रशियातील कोरोना बाधितांची संख्या आता 69,93,954 झाली आहे.