ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 05:44 AM2024-05-17T05:44:18+5:302024-05-17T05:45:20+5:30

उद्धव ठाकरे यांनी भरपावसात प्रचार सभा घेतली. शिवसैनिकसुद्धा भरपावसात उभे राहून सभा ऐकत होते.

those who do not agree with fake bjp should vote for us said uddhav thackeray | ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे

ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे/कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा उल्लेख ‘नकली शिवसेना’ असा करीत आहेत. मात्र, आयारामांमुळे भाजपचीच अवस्था ‘नकली भाजप’ झाली आहे. रा. स्व. संघ व भाजपच्या ज्या मतदारांना भाजपची ही अवस्था अमान्य असेल त्यांनी खऱ्या हिंदुत्वाकरिता माझ्यासोबत यावे, असे आवाहन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात केले. 

दरम्यान, डोंबिलीतील सभेत भाजपचा आमदार गणपत गायकवाड याच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? याचा विचार भाजपच्या नेत्यांनी करावा आणि गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांची हिंमत असेल तर नरेंद्र मोदी यांनी चौकशी करावी, असे आव्हानही उद्धव यांनी दिले. ठाण्यातील व कल्याणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अनुक्रमे राजन विचारे व वैशाली दरेकर-राणे यांच्या प्रचाराकरिता ठाकरे यांच्या सभा झाल्या.

उद्धव म्हणाले की, ठाण्यात भाजपची अशी वाईट अवस्था झाली आहे की, त्यांच्याकडे लोकसभेकरिता उमेदवार नाही. जर त्यांच्याकडे उमेदवार असता तर विचारे यांच्यासमोर भाजपचा उमेदवार असता. मात्र ठाण्यातील भाजप आता गद्दारांच्या सतरंजा उचलण्यापुरता राहिल्याचे ते म्हणाले.

शरद पवार यांनी दिलेल्या एका मुलाखतीनंतर शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, असा प्रचार मोदींनी सुरू केला.  गेली २५ वर्षे शिवसेना भाजपासोबत होती तेव्हा भाजपमध्ये विलीन झाली नाही तर आता कुठल्या पक्षात का विलीन होईल, असा सवालही त्यांनी केला. 

भरपावसात केले भाषण

डोंबिवलीत भागशाळा मैदानात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भरपावसात प्रचार सभा घेतली. शिवसैनिकसुद्धा भरपावसात उभे राहून सभा ऐकत होते. लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असताना पावसातली सभा चर्चेचा विषय ठरली. १३ मे रोजी याच मैदानात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांची सभा आयोजित केली होती. त्यादिवशी वारा, पाऊस यामुळे सभा रद्द झाली होती ती आज भरपावसात झाली.


 

Web Title: those who do not agree with fake bjp should vote for us said uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.