भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 05:21 AM2024-05-17T05:21:08+5:302024-05-17T05:21:47+5:30

भावेश भिंडेच्या कंपनीला १० वर्षांसाठी निविदा पास झाली. होर्डिंगच्या मजबुतीसाठी खूप खर्च झाल्याचे सांगताच, तत्कालीन पोलिस आयुक्त कैसर खालिद यांनी थेट ३० वर्षांसाठी परवानगी दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

bhavesh bhinde earnings of 100 crore per year tender approved for 10 years but permission granted for 30 years | भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी

भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:घाटकोपर होर्डिंगसाठी आरोपी भावेश भिंडेच्या कंपनीला १० वर्षांसाठी निविदा पास झाली. मात्र, होर्डिंगच्या मजबुतीसाठी खूप खर्च झाल्याचे सांगताच, त्यावर तत्कालीन पोलिस आयुक्त कैसर खालिद यांनी थेट ३० वर्षांसाठी परवानगी दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या होर्डिंगच्या माध्यमातून भिंडे  महिन्याकाठी आठ कोटी तर वर्षाकाठी १०० कोटींची कमाई करत असल्याचेही समजते. 

भावेश भिंडेच्या ‘इगो प्रायव्हेट मीडिया’ला २०२१ मध्ये १० वर्षांसाठी टेंडर पास झाले. २०२२ पासून जाहिरात फलक उभे राहिले. घाटकोपर येथील जाहिरात फलक मजबूत आणि स्थिर करण्याचे काम करत असताना सध्याच्या गंभीरपणे अस्थिर संरचना आणि त्या ठिकाणी असलेल्या आरसीसी फाउंडेशनमुळे मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे भावेश भिंडेने सांगून ३० वर्षांसाठी परवानगीची मागणी केली. त्यावर कैसर खालिद यांनी ७ जुलै २०२२ रोजी त्यांना ३० वर्षांसाठी परवानगी दिल्याचे माहिती अधिकारातून निदर्शनास आले. त्यामध्ये सुरक्षेपेक्षा रेट कार्डची माहिती सविस्तर दिसून आली. 

तसेच, भावेश भिंडेला या होर्डिंगमधून वर्षाला १०० कोटी मिळत होते, असा आरोप आहे. यापैकी पोलिस कल्याण निधीमध्ये फक्त सव्वादोन कोटी रुपये जमा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

गृहविभागाकडे अहवाल सादर

रेल्वे पोलिसांकडून होर्डिंग दुर्घटनेसंबंधीचा अहवाल गृहविभागाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच, अन्य यंत्रणांकडून चौकशी अहवाल येताच त्यानुसार, गृहविभाग पुढील कारवाई करणार आहे. 

पेट्रोल पंपातून २५ कोटींची कमाई

येथील पेट्रोल पंप मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त कल्याण निधी संस्थेकडून चालविण्यात येत असून, त्याचे मनुष्यबळ आणि व्यवस्थापनाची जबाबदारी लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आली आहे. त्यांच्याकडून महिन्याला १६ लाख ९७ हजार रुपयांचे भाडे ठरविण्यात आले.
खालिद यांना सक्तीच्या रजेवर पाठवा...

याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत कैसर खालिद यांना सक्तीच्या रजेवर पाठवून खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या ऑडिटर मनोज रामकृष्ण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत कारवाई व्हावी. यात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांना यातून पैसे मिळत असल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे.
 

Web Title: bhavesh bhinde earnings of 100 crore per year tender approved for 10 years but permission granted for 30 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.