Joe Biden: कडक सुरक्षा व्यवस्था भेदली आणि ‘त्याने’ थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची कॉलरच धरली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 12:32 PM2021-06-10T12:32:13+5:302021-06-10T12:52:27+5:30

Joe Biden News: जगातील सर्व राजकीय नेत्यांमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा व्यवस्था ही सर्वात कडक आणि अभेद्य मानली जाते. अगदी व्हाईट हाऊसपासून ते राष्ट्राध्यक्ष जिथे कुठे दौऱ्यावर जातील तिथे ही सुरक्षा व्यवस्था त्यांच्यासोबत असते. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून थेट राष्ट्राध्यक्षांपर्यंत पोहोचण्याचे धाडस एका जीवाने केले आहे.

जगातील सर्व राजकीय नेत्यांमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा व्यवस्था ही सर्वात कडक आणि अभेद्य मानली जाते. अगदी व्हाईट हाऊसपासून ते राष्ट्राध्यक्ष जिथे कुठे दौऱ्यावर जातील तिथे ही सुरक्षा व्यवस्था त्यांच्यासोबत असते. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून थेट राष्ट्राध्यक्षांपर्यंत पोहोचण्याचे धाडस एका जीवाने केले आहे.

काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण कीटक १७ वर्षांनंतर जमिनीखालून वर येत असल्याचे वृत्त आले होते. आता हे कीटक एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले आहेत. या कीटकांनी चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यामध्ये खोडा घालण्याचे काम केले आहे.

त्याचे झाले असे की, बायडेन हे बुधवारी त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर निघण्यासाठी जॉईंट बेस एंड्र्यूज येथे दाखल झाले. तिथे ते अधिकाऱ्यांशी बोलत असताना एक सिकाडा नावाचा कीटक त्यांच्या मानेजवळ कोटावर येऊन बसला. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही का कीटक बायडेन यांच्याजवळ पोहोचला. अखेर राष्ट्राध्यक्षांनी त्याला बाजूला केले.

बायडेन यांनी त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना तुम्ही सिकाडापासून सावध राहा. आताच माझ्यावर एक सिकाडा बसला होता असे सांगितले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

बायडेन यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी डझनभर पत्रकार त्यांच्यासोबत युनायटेड किंग्डम येथे जात होते. मात्र या पत्रकारांच्या चार्टर्ड प्लेनलाही सिकाडा कीटकांनी घेरले. त्यामुळे हे विमान ७ तासांनंतर आकाशात झेपावले.

हे सिकाडा कीटक विमानाच्या इंजिनातही घुसले होते. त्यामुळे विमानाच्या उड्डाणाची वेळ लांबणीवर टाकण्यात आली. हे विमान रात्री ९ वाजता उड्डाण करणार होते. मात्र अखेरीस ते रात्री २ वाजून १५ मिनिटांनी रवाना झाले.

वॉशिंग्टन डीसी हा भाग सिकाडा कीटकांच्या झुंडीमुळे प्रभावित असलेल्या अमेरिकेच्या भागांमध्ये आहे. हे कीटक सध्या अमेरिकेतील १५ राज्यांत दिसत आहेत. सिकाडा कीटक याआधी २००४ मध्ये दिसले होते. आता ते २०३८ मध्ये पुन्हा दिसतील, असे सांगण्यात येत आहेत.

तज्ज्ञांच्या मते सिकाडा कीटकांपासून तसा कुठलाही धोका नाही. कारण हे कीटक माणसांना शोधत नाहीत. तसेच ते माणसांचा चावाही घेत नाही. सिकाडा कीटकांची लांबी २ इंचांपर्यंत असू शकते. सर्वसाधारणपणे हे काळे असतात. तसेच त्यांचा पंख नारिंगी आणि डोळए लाल असतात.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला ह्या ग्वाटेमालाच्या दौऱ्यावर जात असताना हे कीटक विमानात दिसले होते. एक सिक्रेस सर्व्हिस एजंट आणि एका फोटोग्राफरच्या शर्टामध्ये लपताना हे कीटक दिसले होते. त्यानंतर विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी या कीटकांना बाहेर काढण्यात आले होते.