सोशल मीडियाचे व्यसन, तरुणीने जिंकली केस; मेटा-यूट्यूबला न्यायालयाने ठोठावला ५६ कोटींचा दंड, प्रकरण समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:59 IST2026-03-26T15:52:53+5:302026-03-26T15:59:27+5:30

Meta and YouTube social media addiction case: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे लहान मुले आणि माणसांना व्यसन लावत असल्याची चर्चा सुरू असतानाच एक ऐतिहासिक निकाल न्यायालयाने दिला. न्यायालयाने मेटा आणि यू्ट्यूबला याप्रकरणात दोषी ठरवले.

अमेरिकेच्या लॉज एंजलिस न्यायालयाच्या एक सदस्यीय न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. मेटा आणि यूट्यूब लहान मुलांना व्यसन लावत असल्याच्या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल केलेल्या तरुणीने हा खटला जिंकला.

२० वर्षाच्या केली नावाच्या तरुणीने मेटा आणि यूट्यूबच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता. केलीने आरोप केला होता की, मेटा आणि यूट्यूबच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. लहानपणीच या प्लॅटफॉर्मचे व्यसन मला जडले.

न्यायाधीशांनी सांगितले की, "इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपची मालकी असलेली मेटा आणि यूट्यूबची मालकी असलेली गुगल यांनी जाणीवपूर्वक असे प्लॅटफॉर्म तयार केले, ज्याचे लोकांना व्यसन जडेल." केलीने न्यायालयाला सांगितले की, 'वयाच्या नवव्या वर्षी इन्स्टाग्राम आणि सहाव्या वर्षी यूट्यूब वापरायला सुरुवात केली होती. यामुळे माझा कुटुंबासोबत वेळ घालवणे बंद झाले होते कारण मी संपूर्ण वेळ सोशल मीडियाच वापरायला लागले होते.'

केली हिच्या प्रकरणात न्यायालयाने मेटा आणि यूट्यूबला जबाबदार ठरवले. केलीच्या मानसिक आरोग्यावर जो परिणाम झाला आहे, त्याची नुकसान भरपाई म्हणून ६० लाख अमेरिकन डॉलर म्हणजे ५६ कोटी रुपये द्यावेत, असा निकाल न्यायालयाने दिला.

केली हिला ३० लाख डॉलर नुकसान भरपाई म्हणून, तर ३० लाख डॉलर या कंपन्यांना दंड म्हणून देण्यात यावे. केली हिला मिळणाऱ्या ६० लाख डॉलर रकमेपैकी ७० टक्के रक्कम मेटा, तर ३० टक्के रक्कम यूट्यूबला द्यावी लागणार आहे. न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, वाईट हेतूने, शोषण आणि फसवणूक या मार्गांचा वापर करून हे प्लॅटफॉर्म सुरू केले.