मोठी बातमी! आजच रशिया यूक्रेनवर अणुहल्ला करणार? ब्रिटनचा दावा, जगानं सज्ज राहावं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 01:28 PM2022-04-19T13:28:11+5:302022-04-19T13:30:50+5:30

रशिया आणि यूक्रेन यांच्या युद्धाला सुरूवात होऊन जवळपास ५५ दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही कुठलाही ठोस निकाल लागला नाही. रशियन सैन्य जितक्या ताकदीने यूक्रेनच्य शहरांवर हल्ला करत आहेत. तितक्याच कडवटपणे यूक्रेन रशियावर प्रतिहल्ला करत आहे.

मारियुपोल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा रशियाने केला आहे, मात्र युक्रेनने याचा इन्कार केला आहे. युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे की, मारियुपोलमधील परिस्थिती निश्चितच कठीण आहे, परंतु सध्या आम्ही येथे रशियन सैन्याला चोख प्रत्युत्तर देत आहोत.

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियावर आरोप केला आहे की, रशियन सैन्य डॉनबासमध्ये नवीन आक्रमणाची तयारी करत आहे. याठिकाणी सैनिक आणि शस्त्रास्त्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्याचसोबत वोलोडिमिर झेलेंस्की यांनी गंभीर दावा केला आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन अण्वस्त्र हल्ला करण्याच्या शक्यता असल्यानं जगाने तयार राहावे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. देशाची राजधानी, कीव येथे बोलताना, झेलेन्स्की यांनी रशियन अध्यक्ष युक्रेनविरूद्ध रासायनिक शस्त्रे देखील वापरू शकतात अशी भीती व्यक्त केली

सोमवारी माहिती देताना व्हाईट हाऊसने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी युक्रेनला भेट देण्याची योजना पुढे ढकलली आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियन युद्धाला पाठिंबा देण्यासाठी आणि येथील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बायडन यांना कीव येथे येण्यास सांगितले होते.

यूक्रेन-रशिया यांच्यातील युद्धाला महिना उलटत आला तरीही अद्याप युद्ध संपुष्टात आले नाही. या युद्धामुळे अमेरिकेसह नाटो देशांनी हालचाली वाढवल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन(Joe Biden) यांनी ३ बॅक टू बॅक आपत्कालीन बैठका केल्या आहेत.

नाटोच्या प्रत्येक पावलावरून रशियाचा संताप पुढे येत आहे. NATO नं चिथावणी दिल्यास पुतिन अण्वस्त्र हल्ला करू शकतात, असे अमेरिकेतील रशियाचे उपराजदूत दिमित्री पोलान्स्की यांनी म्हटले होते. याआधी क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करण्याबाबत बोलले होते.

रशियाला अपेक्षित असलेला विजय अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व त्यांचे सहकारी काहीसे निराश झाले आहेत. युक्रेनचे नि:शस्त्रीकरण करण्यासाठी कमी क्षमतेच्या अण्वस्त्रांचा वापर करावा, असे रशियाच्या संरक्षण खात्याच्या कागदपत्रांतही नमूद करण्यात आले होते.

युक्रेनचे युद्ध सुरू होऊन सात आठवडे उलटले आहेत. युक्रेनला अमेरिका, नाटो देशांकडून मोठ्या प्रमाणावर मिळणारी लष्करी व आर्थिक मदत थांबवा, असा इशारा रशियाने नुकताच दिला होता. युक्रेनचे युद्ध भविष्यात आणखी तीव्र होईल असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

युक्रेनच्या सीमेजवळ चार रशियन अणुबॉम्बर उडताना दिसले आहेत, असा दावा झेलेन्स्की यांनी जगाला दिला आहे. रशिया आज युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करू शकतो, असा दावा ब्रिटनने केला आहे. त्यामुळे रशिया-यूक्रेन युद्धात काही मोठं घडणार असल्याचं बोलले जात आहे.