ब्रिटनच्या संसदेत भारतातील आंदोलनाचा प्रश्न, पंतप्रधानांच्या उत्तराने सगळेच अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 02:13 PM2020-12-10T14:13:41+5:302020-12-10T14:23:41+5:30

शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी केंद्र सरकारने दिलेला लेखी प्रस्ताव फेटाळून लावला. कायदे रद्दच करा, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या ेत्यांशी चर्चा केली.

त्यात काहीच निष्पन्न झाले नाही. त्यानंतर बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकारतर्फे लेखी प्रस्ताव तयार करण्यात आला.

त्यात नवीन कायद्यांविषयी असलेल्या शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केंद्राने केला. सरकारच्या लेखी प्रस्तावावर शेतकऱ्यांच्या नेत्यांनी दिवसभर विचारमंथन केले. मात्र, त्यानंतर हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला.

विशेष म्हणजे देशातील शेतकरी आंदोलनाचे पडसाद ब्रिटनच्या संसदेही पाहायला मिळाले.

ब्रिटनच्या संसदेत बुधवारी भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. शीख खासदार तनमनजीत सिंग यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन प्रश्न विचारला होता.

खासदार तनमनजीत यांच्या प्रश्नानंतर पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं.

देशात गेल्या 15 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या दिल्ली दरबारी आंदोलन सुरू असून नवीन कृषी विधेयकांना हटविण्याची मागणी शेतकरी करत आहेत. यासंदर्भात तनमनजीत यांनी ब्रिटनच्या संसदेत प्रश्न उपस्थित केला.

सिंग यांच्या प्रश्नामुळे पंतप्रधान बोरिस जॉनसन संभ्रमात पडले होते. तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादावरुन द्विपक्षीय चर्चेतूनच मार्ग निघेल असे उत्तर जॉनसन यांनी दिले

जॉनसन यांच्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्य वाटले, विशेष म्हणजे खासदार ढेसी यांनी सोशल मीडियावरुन जॉनसन यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ शेअर केला आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना भारतात सुरू असलेल्या आंदोलनाची पुसटशीही कल्पना नसल्याचे यावेळी दिसून आले, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधून लंडनमधील शीख समुदायाच्या भावना, त्यांना आंदोलकांची वाटणारी काळजी यासंदर्भात जॉनसन यांनी चर्चा करावी, असा प्रश्न तनमनजीत सिंग यांनी विचारला होता.