पाकिस्ताननं ५० हजार टन साखर आयातीसाठी जारी केली जागतिक निविदा; भारताकडून आयात न करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 10:32 AM2021-04-06T10:32:48+5:302021-04-06T10:39:08+5:30

पाकिस्तानच्या सरकारी ट्रेडिंग कंपनी टीसीपीनं सोमवारी ५० हजार टन साखर आयातीसाठी जागतिक निविदा सादर केली.

सध्या पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. एकीकडे आर्थिक संकटाचा सामना सुरू असतानाच पाकिस्तानसमोर आणखीही काही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पाकिस्तानच्या सरकारी मालकीची कंपनी टीसीपीनं सोमवारी ५० हजार टन पांढरी साखर आयात करण्यासाठी जागतिक निविदा जारी केल्या.

परंतु यात एक अट असून ही आयात भारत, इस्रायल सारख्या बंदी घालण्यात आलेल्या देशांकडून करण्यात येणार नसल्याचंही त्यात सांगण्यात आलं आहे.

दरम्यान भारतातील साखर उद्योगानं पाकिस्तानचा हा निर्णय दुर्देवी असल्याचं म्हटलं.

ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानकडून जारी करण्यात आलेली ही तिसरी निविदा आहे.

यापूर्वी उच्च बोलीमुळे ५०-५० हजार टनच्या दोन निविदा रद्द करण्यात आल्या होत्या.

पाकिस्तानात यावेळी साखरेचं उत्पादन कमी झालं आहे.

अशा परिस्थितीत देशांतर्गत साखरेची उपलब्धता वाढविण्यासाठी आणि किरकोळ विक्रीच्या दराला आळा घालण्यासाठी साखर आयात करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येत आहे.

पाकिस्तानमधील साखरेची किंमत १०० पीकेआरवर (पाकिस्तानी रुपये) वर पोहोचली आहे.

गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने भारत वरून साखर व कापसाच्या आयातीला परवानगी दिल्यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा व्यापार सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र, नंतर पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय बदलला. टीसीपीनं ५० हजार टन सारख आयातीसाठी निविदा जारी केली.

तसंच भारत, इस्रालय किंवा अन्य कोणत्याही बंदी घातलेल्या देशांकडून साखर आयात केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

जागतिक पुरवठा करणार्‍यांना १४ एप्रिलपर्यंत बोली सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, ज्याला याचं कंत्राट देण्यात येईल त्याला कराची बंदरावर साखरेचा पुरवठा करावा लागणार आहे.

"पाकिस्तानसाठी हा निर्णय दुर्देवी आहे. भारतातील साखरेच्या गुणवत्तेप्रमाणे आणि तितक्याच जलदगतीनं त्यांना साखर उपलब्ध होईल का? हा प्रश्न आहे, असं मत ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनचे (एआयएसटीए) अध्यक्ष प्रफुल्ल विठलानी यांनी व्यक्त केलं.

"पाकिस्तानसाठी भारतातून साखर आयात करणं अधिक स्वस्त आणि सुलभ झालं असतं," असंही ते म्हणाले.