CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! चीनने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन; डेल्टा व्हेरिएंटचा नवा स्ट्रेन आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 11:20 AM2021-12-14T11:20:25+5:302021-12-14T11:45:20+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता पुन्हा एकदा चीनने जगाचं टेन्शन वाढवलं आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहेय. रुग्णांच्या संख्येने तब्बल 27 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर एकूण रुग्णसंख्या ही 271,103,431 वर पोहोचली आहे. तर 5,328,601 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनावर मात केली आहे. उपचारानंतर 243,755,375 जण बरे झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे.

प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंतेत भर टाकली आहे.

अनेक देशात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता पुन्हा एकदा चीनने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. चीनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा नवा स्ट्रेन समोर आला आहे.

चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटच्या नवा स्ट्रेनचे तब्बल 138 रुग्ण आढळले आहेत. डेल्टाच्या या नव्या स्ट्रेनला एवाय-4 (AY 4) या नावाने ओळखलं जात आहे. कोरोनाचं हे नवं स्वरुप समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी पूर्व प्रांतातील लाखो नागरिकांना बाहेर प्रवास करण्यावर बंदी घातली आहे.

चीनमध्ये प्रथमच 'डेल्टा' प्रकाराच्या नवीन स्ट्रेनची प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. सरकारी वृत्तसंस्था 'शिन्हुआ'नं रविवारी दिलेल्या माहितीनुसार, 5 ते 12 डिसेंबर दरम्यान झेजियांग प्रांतात कोविड-19 चे 138 प्रकरणं समोर आली आहेत.

निंग्बोमध्ये 11, शाओक्सिंगमध्ये 77 आणि प्रांतीय राजधानी हांगझोऊमध्ये 17 रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण डेल्टाचा स्ट्रेन एवाय 4 नं संक्रमित असल्याचं संपूर्ण जिनोम अनुक्रम आणि विश्लेषणानंतर चाचणीत आढळून आलं आहे.

झेजियांग प्रांतीय रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक सभा आणि प्रवासावर बंदी घातली आहे. झेजियांग प्रांताची लोकसंख्या जवळपास 6.46 कोटी आहे.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 99,780 रुग्ण समोर आले आहेत. यातील जवळपास 4,636 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात अनेकांवर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जागतिक पातळीवर ओमायक्रॉन व्हेरिएंट ज्या वेगाने पसरतोय, ते पाहता त्याचा एकूणच कोरोनाच्या साथीबाबत मोठा परिणाम जाणवू शकतो हे दिसून येत आहे. जर ओमायक्रॉनला रोखायचं असेल, तर आणखी रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याआधी पावलं उचलायला हवीत. हीच योग्य वेळ आहे असं टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंट आता जवळपास 57 देशांमध्ये पोहोचल्याची माहिती मिळत आहे. तो अजून वेगाने इतर देशांमध्येही पसरेल, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेला वाटत आहे. त्यामुळेच सतर्क राहणं हे अत्यंत आवश्यक आहे.

ओमायक्रॉनचं जागितक पातळीवर वेगाने पसरणं किंवा 30 हून अधिक संख्येने असणारे म्युटेशन या गोष्टी हेच दर्शवत आहेत की त्याचा कोरोना साथीचा मोठा परिणाम होऊ शकतो. पण तो परिणाम नेमका काय असेल, हे मात्र आत्ता सांगता येणं कठीण आहे असं टेड्रॉस यांनी स्पष्ट केलं आहे.

नवा व्हेरिएंट जीवघेणा नसल्याचं अनेक संशोधकांचं मत आहे. मात्र, याबाबत डॉ. टेड्रॉस यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. या व्हेरिएंटमुळे मृत्यू होण्याची शक्यता जरी कमी असली, तरी अनेकांना यातून दीर्घकालीन समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

कोरोनाचा दीर्घकाळ सामना करणं किंवा कोरोनातून बरे झाल्यानंतर येणाऱ्या आजारांचा सामना करणं अशा गोष्टी घडू शकतात. आत्ता कुठे आम्हाला ओमायक्रॉनची काही लक्षणं समजू लागली आहेत असं देखील म्हटलं आहे.