बापरे! कोरोनापेक्षा जास्त खतरनाक आहे 'हा' व्हायरस; लसही ठरतेय फेल, मृत्यूदरही खूप जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 02:34 PM2023-02-14T14:34:36+5:302023-02-14T14:40:15+5:30

व्हायरस खूप धोकादायक आहे आणि त्याच्या संसर्गानंतर मृत्यूचे प्रमाण 88 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते

कोरोना व्हायरसचा कहर अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. अशातच धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. आफ्रिकन देश इक्वेटोरियल गिनीमध्ये एक नवीन व्हायरस आला आहे. मारबर्ग व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत 9 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि तो कोरोनापेक्षा जास्त धोकादायक आहे.

इक्वेटोरियल गिनीमध्ये आढळलेल्या मारबर्ग व्हायरसची लक्षणे इबोला व्हायरससारखीच आहेत आणि मोठ्या संख्येने लोकांना याची लागण झाली आहे. मारबर्ग व्हायरसची सामान्य लक्षणे म्हणजे ताप आणि छातीत दुखणे.

मारबर्ग इतका धोकादायक आहे की वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. मारबर्ग व्हायरसची लागण झाल्यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गंभीर इशारा दिला आहे. तसेच लोकांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निवेदनानुसार, बाधित जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेट करणे आणि रोगाची लक्षणे दिसणाऱ्या लोकांवर उपचार आणि काळजी घेण्यासाठी एडवान्स टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मारबर्ग व्हायरस खूप धोकादायक आहे आणि त्याच्या संसर्गानंतर मृत्यूचे प्रमाण 88 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक डॉ. मातशिदिसो मोइती यांनी सांगितले की मारबर्ग व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरतो.

मारबर्ग व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी, WHO ने आरोग्य आपत्कालीन तज्ञ, संसर्ग नियंत्रण संघ, लॅब आणि संप्रेषण कम्यूनिकेशन सपोर्ट सिस्टम तैनात केल्या आहेत. मारबर्ग व्हायरस वटवाघुळांपासून माणसांमध्ये पसरतो.

संक्रमित रुग्णाच्या शरीरातील द्रवपदार्थ, पृष्ठभागाच्या थेट संपर्काद्वारे ते माणसापासून माणसांमध्ये पसरते. या व्हायरसच्या उपचारासाठी अद्याप कोणतीही लस किंवा उपचार सापडलेले नाहीत, तथापि, वेळेवर उपचार केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.