पावसाला दोष देऊ नका, पाकिस्तान जिंकण्यासाठी पात्र नव्हताच; 'वीरू'ने लायकी काढली

T20 World Cup 2024 Updates : वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानी संघावर बोचरी टीका केली.

भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानी संघावर बोचरी टीका केली. पावसामुळे ट्वेंटी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले असल्याचा दावा करणाऱ्या शेजाऱ्यांना 'वीरू'ने सुनावले.

सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेकडून सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतरच्या सामन्यात भारतीय संघाने त्यांच्या तोंडचा घास पळवला. पाच संघांच्या अ गटातून पाकिस्तानला सुपर-८ मध्ये प्रवेश मिळवणे कठीण झाले. अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाल्याने बाबर आझमचा संघ अधिकृतपणे विश्वचषकातून बाहेर झाला.

साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात आयर्लंडविरूद्ध पाकिस्तानला संघर्ष करावा लागला. १०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेजाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. पाकिस्तानने विजय मिळवला असला तरी त्यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागले.

वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, पाकिस्तानी चाहते पावसाला कसे काय दोष देऊ शकतात? ते जिंकले जरी असते तरी पुढे जाण्यासाठी पात्र नव्हते. त्यांना सुपर-८ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला असता. कारण तिथे तगडे संघ आहेत. त्यांनी समजून घेतले पाहिजे की, त्यांना भारताविरूद्ध १२० धावांचे माफक लक्ष्य असताना देखील विजय मिळवता आला नाही. केवळ ११३ धावांत त्यांना घाम फुटला. सेहवाग 'क्रिकबज'शी बोलत होता.

तसेच पाकिस्तानच्या संघाला मायदेशात परतल्यावर नीट विचार करण्याची गरज आहे. या फॉरमॅटमध्ये पुढची रणनीती काय असेल हे ठरवायला हवे. चांगली खेळपट्टी असली तरी ते तगड्या संघाविरूद्ध खेळू शकत नाहीत. बाबरला पुढच्या विश्वचषकात खेळायचे असेल तर फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. आणखी काही नवीन फलंदाज त्यांना शोधावे लागतील, असेही सेहवागने नमूद केले.

ट्वेंटी-२० विश्वचषकातील पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार बाबर आझम टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. शेजाऱ्यांना साखळी फेरीतील चारपैकी दोन सामने गमवावे लागले. अमेरिका आणि भारताकडून झालेल्या पराभवामुळे बाबरच्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

२०१४ पासून प्रथमच पाकिस्तानी संघाला ट्वेंटी-२० विश्वचषकात साखळी फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले. मागील विश्वचषकात उपविजेते पदावर शेजाऱ्यांना समाधान मानावे लागले. प्रथमच विश्वचषक खेळत असलेल्या अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करून मोठा उलटफेर केला.