बायडेन यांचा पंतप्रधान मोदींना फोन; पाकिस्तान भडकला, अमेरिकेला दिली थेट धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 02:03 PM2021-08-04T14:03:45+5:302021-08-04T14:15:02+5:30

PM Modi-Joe Biden telephone call : मानले जाते की बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केल्यामुळेच पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे आणि या अस्वस्थतेतच तो थेट अमेरिकेलाच धमकी देत आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी अेरिकेची धुरा स्वीकारल्यापासून अद्यापही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फोन केलेला नाही. यामुळे पाकिस्तान भडकला आहे आणि त्याने अमेरिकेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे. (Joe biden not called imran khan we have other options Pakistan NSA moeed yusuf blackmail America)

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी धमकीच्या अंदाजात म्हटले आहे, की अमेरिकेचे राष्ट्रपती पाकिस्तानची उपेक्षाच करत राहिले तर आमच्याकडे इतर पर्यायही आहेत.

असे मानले जाते की बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केल्यामुळेच पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे आणि या अस्वस्थतेतच तो थेट अमेरिकेलाच धमकी देत आहे.

फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मोईद युसुफ म्हणाले, 'आमचा देश अफगाणिस्तानच्या तुलनेत महत्त्वाचा असूनही अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी अद्यापही चर्चा केलेली नाही. आम्ही अमेरिकेतून मिळणारे संकेत समजण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक?'

'आम्हाला सांगण्यात आले आहे की, बायडेन फोन करतील. मग, ते तांत्रिक कारण असो किंवा काही इतर. पण स्पष्टपणे सांगायचे तर, लोकांचा आता विश्वास बसत नाही,' असेही एनएसए मोईद युसुफ म्हणाले.

पाकिस्तानकडे पर्याय खुला - पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणाले, "जर एक फोन कॉल सुविधा असेल, जर एक संरक्षण संबंध सुविधा असेल, तर पाकिस्तानकडे पर्याय आहेत." माणले जाते, की असे बोलण्यामागे त्याचा इशारा चीनकडे होता.

दरम्यान, अफगाणिस्तानातील शांततेसाठी पाकिस्तानची महत्त्वाची भूमिका असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच, पाकिस्तानने या पुढेही या प्रकरणात महत्वाची भूमिका पार पाडावी, असेही अमेरिकेने म्हटले आहे.

वृत्तात म्हणण्यात आले आहे, की बायडेन यांनी इम्रान खान यांना फोन न केल्याने पाकिस्‍तानी एनएसएने नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, पाकिस्‍तानने तालिबानला अफगाणिस्‍तानवर कब्‍जा करण्यापासून रोखावे, अशी अमेरिकेची इच्छा असतानाच त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.

बायडेन यांनी अनेक नेत्यांना व्यक्तीगतरित्या फोन केलेला नाही - पाकिस्तानकडे अमेरिकेला पर्याय काय? असे अनेक वेळा विचारूनही मोईद यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. वृत्तपत्राने म्हटले आहे, 'पाकिस्तानने आयरन ब्रदर म्हटल्या जाणाऱ्या चीनशीसोबत घट्ट संबंध निर्माण केले आहेत. चीनने बेल्ट अँड रोड प्रकल्पाद्वारे पाकिस्तानात कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

दरम्यान, बायडेन प्रशासनातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे, की जगात असे अनेक नेते आहेत, ज्यांना बायडेन यांनी अद्यापही वैयक्तिकरित्या फोन केलेला नाही. योग्य वेळ आल्यानंतर ते इम्रान खान यांच्याशीही बोलतील.