तालिबानची सत्ता आल्यावर २४ तासांतच बदलला महिला पत्रकाराचा ड्रेस?; जाणून घ्या Viral Photo मागील सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 03:36 PM2021-08-17T15:36:10+5:302021-08-17T15:43:25+5:30

Afghanistan Taliban Crisis : रविवारी अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवला होता. त्यांनी मिळवलेल्या ताब्यानंतर महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यादरम्यान एका अमेरिकन महिला पत्रकाराचा फोटो व्हायरल होत आहे.

अफगाणिस्तानमधून अमेरिकेनं लष्कराला माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबाननं पाय पसरण्यास सुरूवात केली होती.

पाहता पाहता अवघ्या काही दिवसांतच तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं. यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनीदेखील देश सोडल्याचं वृत्त समोर आलं होतं.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबाननं ताबा मिळवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. विशेषत: अफगाणिस्तानमधील महिलांणध्ये याविषयी अधिक भीती असल्याचं दिसू आलं. याच दरम्यान, एका अमेरिकन टीव्ही रिपोर्टरचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सीएनएन टीव्हीच्या रिपोर्टर क्लेरिसा वॉर्ड यांची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या निरनिराळ्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. दरम्यान, तालिबाननं मिळवलेल्या ताब्यानंतर २४ तासांतच त्यांची वेशभूषा बदलली असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. परंतु यासंदर्भात खुद्द क्लेरिसा यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

क्लेरिया या एकिकडे सामान्य वेस्टर्न प्रोफेशनल वेशभूषेत दिसत आहे, तर दुसरीकडे त्या मुस्लीम महिलांच्या वेशभूषेतही दिसत आहे.

अनेक लोकांना सोशल मीडियावर त्यांनी तालिबानच्या भीतीमुळे आपल्या वेशभूषेत बदल केल्याचा दावा केला आहे. दरम्यान एक ट्वीट करत क्लेरिसा यांनी यासंदर्भात माहिती दिली.

आपले फोटो चुकीच्या पद्धतीनं सादर केले असल्याचं क्लेरिसा यांनी म्हटलं आहे. पहिला फोटो खासगी कंपाऊंडमध्ये घेण्यात आला आहे. तर दुसरा फोटो तालिबानशासित काबुलमधील आहे. मी जेव्हाही काबुलमध्ये रस्त्यांवर रिपोर्टिंगसाठी जाते तेव्हा डोक्यावर कायमच स्कार्फ परिधान करते, असं त्यांनी नमूद केलं आहे.

माझं डोकं पूर्णपणे झाकलेलं नसायचं. नक्कीच थोडा बदल झाला आहे. परंतु तो त्या स्तराइतका नाही जितका फोटोंमध्ये दाखवण्यात आला आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

वॉर्ड यांनी एक आंतरराष्ट्रीय पत्रकार म्हणून यापूर्वीही अनेक कट्टरपंथानं प्रभावित असलेल्या देशांचा दौरा केला होता. त्यांनी २०१२ मध्ये सीरियाच्या अॅलेप्पो शहरातून रिपोर्टिंग केलं होतं. त्यानंतर त्यांनी इजिप्तमधूनही रिपोर्टिंग केलं होतं. २०१४ मध्ये त्या पुन्हा सीरियात गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांनी एक अमेरिकन आणि नेदरलँड्सच्या जिहादीची मुलाखत घेतली होती.

२०१९ मध्ये त्या पहिल्या अशा वेस्टर्न रिपोर्टर बनल्या होत्या ज्यांनी अफगाणिस्तानाती तालिबान शासित क्षेत्रातून रिपोर्टिंग केलं होतं. त्यांनी तालिबानच्या काही मुख्य लोकांच्याही मुलाखती केल्या होत्या. २०२१ मध्ये म्यानमारमध्ये रिपोर्टिंगसाठी स्थानिक पत्रकारांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांना पॅराशूट पत्रकार असंही संबोधलं होतं.

Read in English