India China Faceoff: गलवान खोऱ्यातील संघर्षावर अमेरिकेने भारताबाबत दिली 'अशी' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 05:09 PM2020-06-19T17:09:04+5:302020-06-19T17:49:37+5:30

लडाखच्या गलवान खोऱ्यात LACवर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चीनच्या आक्रमक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य देखील तयार झाले आहेत. मात्र दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, असं चीनकडून सांगण्यात येत आहे.

चीनने आता कुरापती केल्यास योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान सज्ज आहेत. सीमेवर चीनने आपल्या सैन्यात वाढ केल्यानंतर भारताने गलवान घाडी, दौलत बेग ओल्डी, चुशुल आणि देपसांगमध्ये अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. तर भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा आपले सैन्य तैनात करण्याची शक्यता भारतीय लष्कराला आहे. भारत एलएसीवरील फायरिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यासंबंधी विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर अमेरिकेकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया देण्यात आली आहे.अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी ट्वीट करून, भारताप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.

माइक पोम्पिओ म्हणाले की, चीनसोबत झालेल्या संघर्षात भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला. भारतीयांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करत आहोत. या सैनिकांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि त्यांच्या समाज यांची या दु:खद प्रसंगी आम्हाला आठवण येईल, असं माइक पोम्पिओ यांनी सांगितले.

हवाईमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी चीनचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी यांग जिची यांच्यासोबत तब्बल सात तास बैठक पार पडली. या दोघांच्या बैठकीत भारत आणि चीन देशांसंबधी चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक संघर्षानंतर दोन देशांमधील तणाव वाढतच चालला आहे. पण भारतीय सीमेवर संघर्ष वाढू नये, अशी चीनची भूमिका आहे.

सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री रात्री दोन्ही देशांमधील हिंसक चकमकीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४३ सैनिकांचा खात्मा केला. तर चीनला सीमेवर आणखी संघर्ष नको आहे.

दोन्ही देशांनी या परिस्थितीतून संवाद आणि चर्चेतून मार्ग काढावा, अशी चीनची भूमिका आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.