India China FaceOff: नेपाळनंतर आता बांगलादेशही भारताच्या विरोधात?; चीनची सर्वात मोठी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 06:22 PM2020-06-19T18:22:21+5:302020-06-19T18:25:32+5:30

लडाखमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारताला घेरण्याची तयारी सुरु केली आहे. एकीकडे चीनच्या जोरावर नेपाळने भारताचे तीन प्रदेश देशाच्या नकाशात घेऊन भारताकडे डोळे वटारले आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानकडून एलओसीवर वारंवार शस्त्रसंघीचं उल्लंघन करण्यात येत आहे.

नेपाळ, पाकिस्तानसोबत आता चीनने बांगलादेशाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या शेजारील राष्ट्राच्या आर्थिक कुटनीतीच्या डावात चीनने बांगलादेशच्या ९७ टक्के उत्पादनावरील टॅक्स हटवण्याची घोषणा केली आहे.

चीनच्या या मोठ्या घोषणेने बांगलादेशातील राजकीय नेत्यांनी बिजिंग आणि ढाका यांच्यातील संबंधातील हा ऐतिहासिक क्षण आहे असं सांगितले आहे.

बांगलादेशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत घोषणा करताना मत्स्य आणि चमड्याच्या उत्पादनासह ९७ टक्के वस्तूंवर चीनने करात सूट दिली आहे असं सांगितले.

एक महिन्यापूर्वी कोरोना व्हायरसमुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी चीनचे राष्ट्रपती शी चिनफींग यांच्याशी संवाद साधला होता, आर्थिक व्यवहारासाठी आम्ही चीनमध्ये निर्यात होणाऱ्या वस्तू करमुक्त करण्याची मागणी केली होती असं परराष्ट्र खात्याचे अधिकारी मोहम्मद तौहिदुल इस्लाम यांनी सांगितले.

त्यानंतर चीनच्या स्टेट कौन्सिल टॅरिफ कमीशनने अधिसूचना जारी केली आहे. बांगलादेश सर्वात कमी विकसित देश आहे. त्यासाठी त्याला टॅक्समध्ये सूट दिली आहे. त्यामुळे त्यांना कोरोना व्हायरस महामारीपासून निर्माण झालेला तोटा भरुन काढण्यात मदत मिळेल असं सांगितले.

बांगलादेश चीनमधून जवळपास १५ बिलियन डॉलर आयात करतो, तर चीनला बांगलादेशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंची किंमत आयातच्या तुलनेत खूपच कमी असते. चीने बांगलादेशाला दिलेल्या या सूटमुळे व्यापारी तोटा कमी होऊन बांगलादेशाच्या आर्थिक व्यवस्थेला मजबूती मिळेल असं चीनने सांगितले आहे.

सोमवारी रात्री लडाखच्या सीमेवर चीनी आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले आहेत ७६ जवान जखमी झाले आहे.

भारत आणि चीन यांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशाने त्यांच्या सैनिकांना अलर्टवर ठेवलं आहे. लडाख सीमेजवळ गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने लष्कराला फ्रि हँड दिल्याची माहिती आहे.

भारत आणि चीन एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने चीननेही आता भारताविरोधात रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. गलवान हा चीनचा प्रदेश असल्याचा दावा चीनी सरकार करत आहे पण हा भाग लडाखचा असल्याचं भारताने स्पष्ट भूमिका घेतली आहे.