अर्ध्या विमानाची राख झाली, अर्ध्याचे तुकडे झाले, १७९ जणांनी जीव गमावला; पाहा अपघाताचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 16:30 IST2024-12-29T16:05:42+5:302024-12-29T16:30:34+5:30

दक्षिण कोरियात आज लँडिंगवेळी विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये १७९ जणांचा मृ्त्यू झाला.

रविवार जेजू एअर बोईंग ७३७-८०० विमान धावपट्टीवरून घसरले आणि दक्षिण कोरियामध्ये एका कुंपणाला आदळले, त्यानंतर विमानाला आग लागली. या अपघातात १७९ जणांना जीव गमवावा लागला.

फ्लाइटमध्ये १८१ लोक होते असे सांगण्यात येत आहे. योनहॅप न्यूज एजन्सीने अग्निशमन दलाच्या जवानांच्या हवाल्याने सांगितले की, विमानातील दोन जण वाचले, तर इतरांचा मृत्यू झाला.

स्थानिक वेळेनुसार, सकाळी ९.०७ वाजता जेजू एअर फ्लाइट 2216 देशाच्या नैऋत्येकडील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला.

पहिल्या लँडिंगच्या प्रयत्नात यश न आल्याने विमान क्रॅश लँडिंग अर्थात बेली लँडिंगचा प्रयत्न करत होते. हे देखील यशस्वी झाले नाही आणि धावपट्टी संपण्यापूर्वी वेग कमी झाला नाही आणि विमान पुढे सीमेवर आदळले.

यानंतर विमानाला आग लागली आणि त्यामुळे विमानात बसलेल्या जवळपास सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाला.

विमान धावपट्टीला घासून पुढे सरकत आहे आणि नंतर सीमेवर आदळत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर विमानाला आग लागते आणि विमानाचे तुकडे होतात.

लँडिंग गिअरमध्ये बिघाड, पक्ष्यांच्या थव्याशी टक्कर झाली या कारणांमुळे सुरक्षित लँडिंग होऊ शकले नाही, असे सांगण्यात येत आहे.

लँडिंग गियरद्वारे विमान उतरवले जाते. ही एक संपूर्ण यंत्रणा आहे, यामध्ये विमानाचे टायर लँडिंगच्या वेळी काम करतात आणि विमान धावपट्टीवर उतरवतात.

बऱ्याच वेळा लँडिंगच्या वेळी पक्षी आदळल्याने ही यंत्रणा बिघडते, यामुळे टायर खाली घेण्याच अडचणी येतात. कोरिया अपघातातही असेच घडले.