coronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी थांबली, WHO कडून अशी प्रतिक्रिया आली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 10:54 AM2020-09-10T10:54:52+5:302020-09-10T11:07:49+5:30

लसीची चाचणी झालेल्या एका स्वयंसेवकावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी तातडीने थांबवण्यात आली आहे.

मानवजातीसमोरील मोठे आव्हान ठरलेल्या कोरोना विषाणूविरोधात लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान, या संशोधनात ऑक्सफर्डच्या लसीने आघाडी घेतली होती. मात्र या लसीची चाचणी अचानक थांबवण्यात आल्याने कोरोनाविरोधातील लढाईल धक्का बसला आहे.

WHO च्या मुख्य संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, कोविड-१९ च्या लसीचे पहिले आणि आवश्यक प्राधान्य ही त्याची सुरक्षितता हे असले पाहिजे. आम्ही लस लवकर आणण्याबाबत बोलत आहोत. मात्र त्याचा अर्थ तिच्या सुरक्षेत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जावी असा होत नाही.

लसीची चाचणी झालेल्या एका स्वयंसेवकावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी तातडीने थांबवण्यात आली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कुठल्याही परिस्थितीत कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत तडजोड केली जाणार नाही असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे.

कोरोनावरील लस विकसित करताना सर्व नियमांचे पालन केले गेले पाहिजे. तसेच लोकांना औषधे आणि लस देण्यापूर्वी त्याच्या सुरक्षिततेची तपासणी होणे आवश्यक आहे.

ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनिका यांनी विकसित केलेली कोरोनाची लस घेणाऱ्या एका स्वयंसेवकाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम दिसून आल्यानंतर अमेरिकेत या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या रोखण्यात आल्या आहेत.

याबाबत अॅस्ट्राजेनेकाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही एक नियमित प्रतिक्रिया आहे. चाचण्यांदरम्यान, अशा प्रकारांच्या तपासणीसाठी असे निर्णय घ्यावे लागतात. चाचणी ही पूर्णपणे प्रामाणिकपणे केली पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न असतो. दरम्यान, या लसीच्या परीक्षणामध्ये वेग आणण्यासाठी आणि चाचणीची कालमर्यादा कमी करण्यासाठी काम केले जात आहे.

कोरोनावरील ही लस विकसित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार सुरक्षिततेला प्राधान्य देऊन संशोधकांनी या लसीच्या चाचणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तर प्रायोगिक चाचणी ही रद्द करण्यात आली नसून काही दिवसांसाठी थांबवण्यात आली आहे. मात्र पुन्हा चाचणीला कधी सुरुवात होणार हे मात्र अॅस्ट्राजेनेकाने सांगितलेले नाही.

ऑक्सफर्डच्या कोरोनावरील या लसीची चाचणी भारतामध्येसुद्धा सुरू आहे. तसेच या लसीचे उत्पादन करण्यासाठी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राजेनेकाने पुण्यातील सीरम इंस्टिट्युटसोबत करार केला आहे.