CoronaVirus News : हाहाकार! 110 देशांमध्ये वेगाने वाढतोय 'कोरोना', साथ अजून संपली नाही; WHO चा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 01:01 PM2022-06-30T13:01:06+5:302022-06-30T13:14:28+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारी बदलत आहे, परंतु ती अजून संपलेली नाही.

जगभरात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस ही एक मोठी समस्या बनली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या व्हायरसमुळे कोट्यवधी लोक त्रस्त असून विविध अडचणींचा सामना करत आहेत.

भारत ही कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 18,819 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 525116 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जगभरातही कोरोनाने थैमान घातले आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारी बदलत आहे, परंतु ती अजून संपलेली नाही. तब्बल 110 देशांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे असा गंभीर इशारा देखील दिला आहे.

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस एडनॉम गेब्रेयसस यांनी 'ही महामारी बदलत आहे पण ती अद्याप संपलेली नाही. आम्ही प्रगती केली आहे. पण सर्व काही ठीक झाले असे म्हणता येणार नाही असं म्हटलं आहे.

"जीनोम सिक्वेन्सिंग कमी झाल्यामुळे कोरोना व्हायरसचा मागोवा घेण्याची आमची क्षमता धोक्यात आहे. याचा अर्थ Omicron चा मागोवा घेणे आणि भविष्यातील नव्या व्हेरिएंटचे विश्लेषण करणे कठीण होत आहे."

ते पुढे म्हणाले, 'कोविड 19, BA.4 आणि BA.5 ची प्रकरणे काही देशांमध्ये वाढली आहेत. 110 देशांमध्ये प्रकरणे वाढत आहेत, ज्यामुळे एकूण जागतिक प्रकरणांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि डब्ल्यूएचओच्या 6 पैकी 3 क्षेत्रांमध्ये कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे मृत्यूची संख्या वाढली आहे.

जागतिक स्तरावरील आकडेवारी अपेक्षेप्रमाणे स्थिर राहिली आहे. WHO प्रमुखांनी कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लसीकरणाच्या संथ गतीबद्दल चिंता व्यक्त केली, ज्यामुळे त्या भागातील लोकसंख्येला व्हायरसच्या भविष्यातील लाटेमुळे धोका निर्माण होतो.

महासंचालक म्हणाले की डब्ल्यूएचओने सर्व देशांना त्यांच्या लोकसंख्येपैकी किमान 70 टक्के लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या 18 महिन्यांत जगभरात 12 अब्जाहून अधिक लसींचे वितरण करण्यात आले आहे.

"फक्त 58 देशांनी लसीकरणाचे 70 टक्के लक्ष्य गाठले आहे, काहींनी म्हटले आहे की कमी उत्पन्न असलेल्या देशांना लस तयार करणे शक्य नाही." कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

टेड्रोस एडऩॉम गेब्रेयसस यांनी रवांडाचे उदाहरण दिले, जिथे लसीकरणाचा दुसरा डोस 65 टक्क्यांहून अधिक आहे आणि अजूनही वाढत आहे. डब्ल्यूएचओ प्रमुखांनी अधोरेखित केले की सर्वात जोखीम असलेल्या गटांना लसीकरण करणे महत्वाचे आहे.

डब्ल्यूएचओच्या महासंचालकांनीही याआधी मंकीपॉक्सबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले की मंकीपॉक्स ही सध्या जगासाठी हेल्थ इमर्जन्सी नाही. व्हायरसच्या सततच्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त करताना, म्हणाले की मुले आणि गर्भवती महिलांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.