'या' एका अटीवर मिळू शकतो चीनचा व्हिसा; नेमकं काय करावं लागणार? वाचा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 04:16 PM2021-03-16T16:16:39+5:302021-03-16T16:21:18+5:30

chinese visa - आता भारतीयांना चीनचा व्हिसा मिळू शकतो. परंतु, त्यासाठी चीनकडून अजब अट ठेवण्यात आली आहे. या एका अटीची पूर्तता केल्यानंतरच चीनचा व्हिसा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. काय आहे नेमकी अट? त्यासाठी नेमकं काय करावं लागणार? जाणून घ्या, संपूर्ण डिटेल्स...

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना (coronavirus) रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होताना पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले होते. परदेशी प्रवासाला परवानगी देण्यात आली नव्हती. आता मात्र, चीनमध्ये जाण्याची परवानगी दिली जात आहे. (chinese visa)

शिक्षण, व्यवसाय किंवा अन्य कारणांसाठी चीनमध्ये गेलेल्या शेकडो भारतीय कोरोना संकटामुळे मायदेशात परतले होते. यानंतर शिक्षणासाठी चीनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना चीनमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली होती. परंतु, आता चीनचा व्हिसा भारतीयांसाठी खुला करण्यात आला आहे.

आता भारतीयांना चीनचा व्हिसा मिळू शकतो. परंतु, त्यासाठी चीनकडून अजब अट ठेवण्यात आली आहे. या एका अटीची पूर्तता केल्यानंतरच चीनचा व्हिसा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. काय आहे नेमकी अट? त्यासाठी नेमकं काय करावं लागणार? जाणून घ्या, संपूर्ण डिटेल्स... (chinese embassy cleared that these are only conditions to apply for visa to indians)

चीन दूतावासाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चीन केवळ त्याच भारतीयांना व्हिसा देण्यास तयार झाला आहे, ज्यांनी चीनमध्ये विकसित करण्यात आलेली कोरोना लस घेतली असेल. एवढेच नव्हे, तर चीनची कोरोना लस घेतल्याचे सर्टिफिकेटही या प्रक्रियेदरम्यान दाखवावे लागणार आहे.

चीनकडून १५ मार्च रोजी व्हिसा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील एक नोटीस चीन दूतावासाकडून जारी करण्यात आली आहे. भारतात कोणत्याही चिनी कोरोना लसीला मंजुरी देण्यात आलेली नाही. असे असताना चीनकडून जारी करण्यात आलेल्या या नोटिसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

चीनचा व्हिसा हवा असेल, तर चीनमध्ये विकसित करण्यात आलेल्या कोरोना लस घेणे बंधनकारक असेल. त्यानंतरच एखादी व्यक्ती चीनच्या व्हिसासाठी अर्ज करू शकते, असे सांगितले जात आहे.

चीनमध्ये जाणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना आरोग्य प्रमाणपत्रही द्यावे लागणार आहे. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन यासाठी अर्ज करता येऊ शकेल, असे सांगितले जात आहे. http://hrhk.cs.mfa.gov.cn/H5/

दरम्यान, केवळ पाकिस्तान, ब्राझील आणि चिली या देशांमध्ये चीनमध्ये विकसित करण्यात आलेली कोरोना लस दिली जात आहे. चीनच्या सिनोफार्म लसीला संयुक्त अरब अमिरातीने डिसेंबर महिन्यातच मंजुरी दिली होती.

सिंगापूर, मलेशिया आणि फिलिपाइन्स या देशांनी चीनच्या सिनोव्हॅकशी करार केला असून, तुर्की देशानेही याला मंजुरी दिली आहे. मात्र, चीनच्या या अजब अटीमुळे भारतीयांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे.