अबब! चीनची सर्वांत वेगवान बुलेट ट्रेन; ताशी वेग ६०० किमी, हजार किमीचा प्रवास २.५ तासांत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 11:59 AM2021-07-23T11:59:57+5:302021-07-23T12:04:55+5:30

जपानपासून जर्मनीपर्यंतचे देश मॅग्लेव्ह जाळे (नेटवर्क्स) बांधण्याचा विचार करीत आहेत.

बीजिंग : चीनने जगातील सर्वांत वेगवान रेल्वे जनतेसमोर आणली. तासाला ६०० किलोमीटरने धावण्याची तिची क्षमता आहे.

चीनने क्विंगदाओ या किनारी शहरात बनवलेली ही रेल्वे बीजिंग ते शांघाय हे एक हजारपेक्षा जास्त (६२० मैल्स) किलोमीटरचे अंतर कापण्यास फक्त अडीच तास घेईल. मॅग्लेव्ह ही रेल्वे वाहतुकीची व्यवस्था आहे.

यात मॅग्नेटसचे (लोहचुंबकाचे) दोन संच वापरतात. एक संच रेल्वेला मागे लोटून तिला रेल्वे मार्गावरून वर उचलून ढकलतो तर दुसरा संच उंच झालेल्या रेल्वेला घर्षणामुळे नाहीशी होणारी शक्ती टळत असल्यामुळे पुढे गती देतो.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचा वापर होत असलेली ही रेल्वे रेल्वेरुळांवरून अधांतरी उचलली जाते. रेल्वेचा रेल्वेमार्गाशी संपर्कच येत नाही. गेल्या दोन दशकांपासून चीन मर्यादित प्रमाणावर हे तंत्रज्ञान वापरत आहे.

शांघायमध्ये एका विमानतळापासून ते गाव या छोट्या अंतरासाठी शॉर्ट मॅग्लेव्ह लाइन उपलब्ध आहे. चीनमध्ये एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जाण्यासाठी किंवा दोन शहरांना जोडणाऱ्या मॅग्लेव्ह लाइन्स उपलब्ध नाहीत.

शांघाय आणि चेंगडूसह काही शहरांनी त्यासाठी संशोधन सुरू केले आहे. बीजिंग ते शांघाय हा प्रवास विमानाने केला तर तीन तासांचा तर हायस्पीड रेल्वेने केला तर साडेपाच तासांचा आहे.

जपानपासून जर्मनीपर्यंतचे देश मॅग्लेव्ह जाळे (नेटवर्क्स) बांधण्याचा विचार करीत आहेत. यासाठी येणारा प्रचंड खर्च आणि सध्या रेल्वेमार्गाची जी सेवा आहे ती विसंगत असल्यामुळे वेगाने विकास होण्यात अडथळे येत आहेत.

दरम्यान अरुणाचल प्रदेशपासून काहीच अंतरावर असलेल्या तिबेटपर्यंत चीनने आपल्या बुलेट ट्रेन सेवेचा विस्तार केला आहे. अरुणाचल प्रदेशच्या जवळ असलेल्या निंगची हे गाव आणि तिबेटची राजधानी ल्हासा यांना ही रेल्वे जोडते. तिबेट हा स्वायत्त प्रांत असून, सिचुआन-तिबेट रेल्वे सेक्शनच्या ल्हासा-निंगची या ४३५.५ किमी अंतरासाठी चीनने बुलेट ट्रेन सुरू केली आहे.

या रेल्वेचा वेग ताशी १६० किलोमीटर असून, ती सिंगल लाइन इलेक्ट्रिफाइड आहे. ल्हासासह नऊ स्टेशन्सवर ती थांबणार आहे. प्रवासी आणि मालवाहतूक अशी दोन्ही सेवा देणारी ही रेल्वे आहे. ल्हासा-निंगची रेल्वेने ल्हासा ते निंगची हा रस्ता मार्गे प्रवास पाच ते अंदाजे साडेतीन तास इतका कमी केला आहे.

या रेल्वेमार्गावर ४७ बोगदे आणि १२१ पूल आहेत आणि स्थानिक पातळीवर ओळखली जाणारी यार्लुंग झॅंगबो नावाची ब्रह्मपुत्रा नदी ही रेल्वे १६ वेळा ओलांडते.

Read in English