भारत की चीन? संघर्षाची वेळ आल्यास कुणाला देणार साथ; रशियाने दिले असे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:21 PM2020-06-24T13:21:22+5:302020-06-24T13:42:08+5:30

भविष्यात भारत आणि चीन यांच्यात संघर्षी तीव्र झाल्यास रशिया कुणाची बाजू घेईल, हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.

लडाखमधील सीमावादावरून सध्या चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेला तणाव विकोपाला गेला आहे. हा तणाव निवणळण्यासाठी दोन्ही देशांशी चांगले संबंध ठेवून असलेला रशिया पडद्यामागून प्रयत्न करत आहे. त्यासाठी रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काल पुढाकार घेऊन, रशिया, भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठकही आयोजित केली होती. तसेच भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर भविष्यात भारत आणि चीन यांच्यात संघर्षी तीव्र झाल्यास रशिया कुणाची बाजू घेईल, हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.

गेल्या काही वर्षांमधील घडामोडी पाहिल्यास रशिया आणि चीन एकमेकांच्या जवळ आले आहेत. तसेच दोन्ही देशांमधील व्यापारही वाढला आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला जी-७ देशांमध्ये सहभागी होण्याचा प्रस्तावही रशियाने ही चीनला वेगळे पाडण्याची रणनीती असल्याचे सांगत फेटाळला होता. तर भारत या प्रस्तावाबाबत सकारात्मक होता. ही बाब भारत आणि रशियामधील मैत्रिसाठी चांगले संकेत नसल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी मंगळवारी झालेल्या तीन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला विवाद मिटवण्यासाठी कुण्या तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र याच बैठकीत ‘’सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान केला पाहिजे आणि एक स्थायी जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जगातील आघाडीच्या देशांनी याबाबत उदाहरण प्रस्थापित केले पाहिजे,’’ असा टोला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे नाव न घेता लगावला होता.

दरम्यान, सध्या रशियाच्या दौऱ्यावर असलेले भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अजेंड्यावर शस्त्रास्त्र खरेदी प्रामुख्याने आहे. रशियाकडून लवकरात लवकर शस्रास्त्रे मिळतील, तसेच भारताने ज्या मागण्या केल्या आहेत त्यांची पूर्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर रशियाचे उपपंतप्रधान वाय. बोरिसोव्ह यांनी भारताची अखंडता आणि एकात्मतेबाबत काही संकट निर्माण झाल्यास भारतासोबत उभे राहण्याचा रशियाचा प्रयत्न असेल, असे सांगितले.

भारताच्या चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारताकडे मोठ्या प्रमाणावर रशियन हत्यारे आणि मशिन्स आहेत. त्यामुळे त्यांच्या देखभार दुरुस्तीसाठी रशियाच्या मदतीची गरज भासणार आहे.

अशा परिस्थितीत भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष वाढल्यास रशिया कुणाच्या बाजूने उभा राहील असा प्रश्न निर्माण झाला आहे. भूतकाळ विचारात घेतला तर रशियाने भारताला अनेकदा विश्वासाने मदत केली आहे. मात्र सध्या जागतिक समीकरणे बदलली आहेत. त्यात अमेरिकेचा सामना करण्यासाठी रशिया चीनसोबतचे आपले संबंध दृढ ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर इंडो-पॅसिफिक रणनीतीमध्येही भारतापेक्षा चीन रशियाच्या अधिक जवळ आहे. त्यात सद्यस्थितीत रशियाची आर्थिक स्थितीही पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळे भारताला एकतर्फी पाठिंबा देणे रशियाला शक्य होणे कठीण आहे.

याबाबत सेंचर फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह युरोपियन अँड इंटरनॅशनल स्टडीजचे सीनियर रिसर्च फेलो वासिली बी. काशिन सांगतात की, भारत आणि चीन यांच्यात जो संघर्ष सुरू आहे तो दुखद आहे. मात्र या संघर्षात रशिया कुणाचीही बाजू घेणार नाही. तसेच कुठल्याही विरोधालाही पाठिंबा देणार नाही. सध्या दोन्ही देशांशी जसे संबंध आहेत तसेच कायम ठेवेल.

व्यापाराचा विचार केल्यास रशियाचा ४० टक्के व्यापार हा युरोपियन युनियन आणि १५ टक्के व्यापार चीनच्या सोबत होतो. त्यामुळे व्यापाराच्या बाबतीत रशिया चीनवर तितकासा अवलंबून नाही. मात्र संरक्षण करारांच्या बाबतीत रशियाला चीनकडून चांगले संकेत मिळत आहेत.

ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे फेलो नंदन उन्नीकृष्णन यांनी सांगितले की, भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादात रशिया फारशी ढवळाढवळ करणार नाही. रशियाचा व्यापार केवळ चीनवर अवलंबून नाही तर भारताशीसुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे जे चीनला अपेक्षित आहे ते रशिया कधीही करणार नाही.

IMEMO चे रिसर्च फेटो अॅलेक्सी कुप्रियानोव्ह यांनी सांगितले की, भारत आणि चीन हे दोघेही रशियाचे रणनीतीक भागीदार आहेत. तसेच शांतता कायम राहण्यास रशियाचे प्राधान्य आहे. त्यामुळे रशिया कुठल्याही प्रकारच्या युद्धाचे समर्थन करणार नाही.

मात्र शस्त्रास्त्र पुरवठ्याच्या बाबतीत रशिया भारताला खूप मदतगार ठरू शकतो. रशिया भारताला डिफेन्स मिसाईल सिस्टिम एस-४०० देणार आहे. हे अस्र रशियाने चीनलाही दिलेले आहे. मात्र त्याची रेंज कमी आहे. रशियाची शस्त्रास्र व्यवहारांबाबतची पद्धत इतरांपेक्षा चांगली आहे, त्यामुळे भारत आणि रशियामधील संबंध चांगलेच राहतील, असे माजी मुत्सद्दी कंवल सिब्बल यांनी सांगितले.

दुसरीकडे अमेरिकेने भारत आणि चीनमध्ये मध्यस्थी करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र भारत आणि चीनमधील तणावामध्ये अमेरिकेने हाँगकाँग, तैवान आणि कोरोनादरम्यान, दाखवली तशी आक्रमकता दाखवली तशी अद्याप दाखवलेली नाही.

आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक देश आपल्या हिताचा विचार करून धोरण ठरवत असतो. स्वाभाविकपणे भारत आणि चीनमधील तणावादरम्यान रशिया आणि अमेरिका याच आधारे निर्णय घेतील अशी शक्यता आहे.