पाकिस्तानचं तालिबान प्रेम पुन्हा उघड; परराष्ट्रमंत्री म्हणाले,"अफगाण सरकार तालिबान विरोधात अपप्रचार करत होतं"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 15:03 IST2021-08-19T14:53:50+5:302021-08-19T15:03:23+5:30
Afghanistan Taliban Crisis : पाकिस्तानचं तालिबान प्रेम पुन्हा एकदा झालं उघड. पंतप्रधानांनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून तालिबानची पाठराखण.

पाकिस्तानचं तालिबानवरील प्रेम पुन्हा एकदा समोर आलं आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या तालिबानच्या रक्तपातादरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी तालिबानबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
"यापूर्वीचं अफगाण सरकार तालिबानविरोधात अपप्रचार करत होतं. त्यांच्या गोष्टी आता खोट्या सिद्ध होत आहेत," असं पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी म्हणाले.
"तालिबाननं सरकारी कर्मचाऱ्यांना सामूहिक माफीची घोषणा केली आहे. तसंच मुलांना शिक्षणापासून रोखण्यात येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे," असं परराष्ट्रमंत्र्यांनी नमूद केलं.
कुरैशी यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केलं. "तालिबान मुलींच्या शिक्षणावर बंदी घालेल अशी भीती होती. परंतु असं झालं नाही. तालिबाननं सामूहिक माफीची घोषणा केली आहे आणि ते शाळा, व्यवहारही सुरू करत आहेत," असं ते म्हणाले.
"तालिबाननं कोणाशीही बदला घेणार नसल्याचं सांगितलं आहे. आतापर्यंत त्यांनी जी पावलं उचलली आहेत ती शांततापूर्ण आहेत, त्याचं स्वागत केलं गेलं पाहिजे," असं कुरैशी यांनी नमूद केलं.
डॉन न्यूजच्या वृत्तानुसार पाकिसातनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असंही म्हटलं की, सोशल मीडियावर पाकिस्तानविरोधात खोटा ट्रेंड सुरू करण्यात आला होता, जो अपयशी ठरला. संपूर्ण जगातील जनतेला माहित आहे, अफगाणिस्तानमधील प्रशासन व्यवस्था भ्रष्ट होती, असंही कुरैशी म्हणाले.
यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही तालिबानच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं होतं. अफगाणिस्तानात तालिबान्यांची साथ देणार असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं होतं.
त्यांनी अफगाणिस्तानवरतालिबान्यांनी मिळवलेल्या नियंत्रणाचं समर्थन केलं होतं. अफगाणिस्तानची आज गुलामीच्या साखळदंडातून मुक्तता झाली आहे, असंही इम्रान खान म्हणाले होते.
याच मुद्द्यावरुन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. अफगाणिस्तानातील नव्या सरकारला एकतर्फी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालायला हवी असं जॉन्सन इम्रान खान यांना फोनवर म्हणाले होते.