केमिकलयुक्त रंगांचे त्वचेला होतात 'हे' नुकसान, जाणून घ्या कशी घ्याल काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 03:25 PM2024-03-23T15:25:29+5:302024-03-23T15:53:26+5:30

Holi Tips : आज आम्ही तुम्हाला चुकीच्या किंवा केमिकलयुक्त रंगाचे काय नुकसान होतात आणि त्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याच्या टिप्स देणार आहोत.

होळीला रंग खेळण्याची मजाच काही वेगळी असते. लोक फार आतुरतेने या उत्सवाची वाट बघत असतात. फार आधी नैसर्गिक रंगांनी म्हणजे फुलांच्या रंगांनी रंग खेळले जात होते. पण आता अनेक केमिकलयुक्त रंग बाजारात मिळतात. जे त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतात. याचे नुकसान माहीत असूनही काही लोक असे रंग वापरतात आणि शरीराचं नुकसान करून बसतात. अशात आज आम्ही तुम्हाला चुकीच्या किंवा केमिकलयुक्त रंगाचे काय नुकसान होतात आणि त्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याच्या टिप्स देणार आहोत.

रंगांमुळे होणारे नुकसान? - रंग खेळताना तो डोळ्यात जाण्याचा सर्वात जास्त धोका असतो. डोळ्यात रंग गेल्यावर जळजळ होते आणि डोळे लाल होतात. जर केमिकलयुक्त रंग डोळ्यात गेला तर डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते. आपली त्वचा फार नाजूक असते. केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचेचं फार जास्त नुकसान होतं. रंग लावल्यावर खाज येणे, डाग पडणे आणि सूज येणे अशा समस्या होतात. तसेच स्कीन कॅन्सर होण्याचा धोकाही असतोच. बाजारात मिळणारे केमिकलयुक्त रंग केसांनाही प्रभावित करतात. केसांना रंग लावल्यानंतर केसगळती, डॅंड्रफसारखी समस्या होते. कोरड्या रंगांनी रंग खेळणं सुरक्षित असतं, असा काही लोकांचा समज असतो. पण असं नाहीये. कोरडा रंग हवेतून आपल्या नाकात आणि तोंडाच्या माध्यमातून शरीरात जातो. यामुळे दमा किंवा श्वासासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते.

कसा कराल बचाव? - 1) होळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही रंगांमध्ये मेटल ऑक्साइड मिश्रित केलेलं असतं. ज्यामुळे केसांचं फार जास्त नुकसान होतं. त्यामुळे रंग खेळण्याआधी खोबऱ्याचं किंवा मोहरीचं तेल केसांना लावा.

2) रंग खेळायला जाण्याआधी शरीरावर खोबऱ्याचं तेल लावा. याने रंग शरीरावर जास्त वेळ टिकणार नाही. त्यासोबतच कान, नाक, डोळ्यांच्या आजूबाजूला व्हॅसलीन लावा. असं केल्याने हानिकारक रंग कानातून, नाकातून किंवा तोडांतून शरीराच्या आत आत जाणार नाहीत.

3) रंग काढण्यासाठी अनेकदा लोक गरम पाण्याचा वापर करतात, पण असे केल्याने रंग त्वचेवर आणखी घट्ट बसतो. त्यासोबतच त्वचाही कोरडी पडते. त्यामुळे रंग काढण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा.

4) अनेकदा लोक रंग काढण्यासाठी केरोसीन ऑइल, पेट्रोल याचाही वापर करतात. असं केल्यास शरीरावर पुरळ येण्याची शक्यता असते. रंग काढण्यासाठी घरी तयार केलेल्या बेसनाची पेस्ट शरीरावर लावा.

रंग खेळून झाल्यावर काय कराल - रंग काढण्यासाठी साबणाने तुमची त्वचा जोरजोरात चोळू नका. पपई-काकडीपासून अथवा चंदनापासून तयार केलेल्या सौम्य साबणाचा वापर करा.

- त्यानंतर त्वचेवर ऑलिव्ह ऑइल लावा. हे तेल हलके असल्याने ते त्वचेमध्ये त्वरित मुरते, शिवाय यात असलेल्या ‘ई’ जीवनसत्त्व आणि अँटी ऑक्सिडंट्समुळे ते त्वचेचे कंडिशनिंग उत्तम प्रकारे करते आणि त्वचा कोरडी पडत नाही.

- सर्वप्रथम तुमच्या केसांमधून कोरडे रंग आणि मायकाचे लहान कण काढून टाकण्यासाठी भरपूर पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर, एसएलएस मुक्त रोझमेरी लॅव्हेंडर साबणाने केस धुऊन घ्या.

- तरीही केसांवर काही रंग मागे राहिला असेल, तर त्याच दिवशी केस धुऊ नका. त्यामुळे केस अधिक कोरडे होऊन विस्कटल्यासारखे दिसतील. केस वाळले की, त्यानंतर ऑलिव्ह ऑइलनी केसांना मसाज करा. दुसऱ्या दिवशी केस धुऊन घ्या. या तेलामुळे केस निरोगी, मजबूत आणि चमकदार होतात.