Corona Vaccine: कोरोना उपचारासाठी कोणती लस सर्वात जास्त प्रभावी, कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन? ICMR च्या रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 06:32 AM2021-05-22T06:32:17+5:302021-05-22T06:36:56+5:30

Coronavirus: देशभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मात्र, मृत्यूच्या नोंदी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश राज्य, केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ४ हजार २०९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारताचा कोरोना मृत्यूदर १.११ वरून १.१२ टक्क्यांवर गेला आहे. महाराष्ट्रात ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ५४८, तामिळनाडू ३९७ तसेच दिल्लीत २५२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला.

देशभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मात्र, मृत्यूच्या नोंदी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे निर्देश राज्य, केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ५९ हजार ५५१ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. तर ३ लाख ५७ हजार २९५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. गेल्या २४ तासांतील एकूण कोरोनाबाधितांपैकी ७७ टक्के रुग्ण १० राज्यांत आढळले. त्यात तामिळनाडूत सर्वाधिक ३५ हजार ५७९ रुग्णांची भर पडली.

देशात आतापर्यंत १९ कोटी १८ लाख ७९ हजार ५०३ लसीचे डोस लावण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये १४ लाख ८२ हजार ७५४ लोकांचे लसीकरण झाले. आतापर्यंत एकूण ३२ कोटी ४४ लाख १७ हजार ८७० तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील २० लाख ६१ हजार ६८३ तपासण्या २४ तासात करण्यात आल्यात.

कोरोना लसीच्या दोन डोसमध्ये किती कालावधी ठेवावा याबद्दल आयसीएमआरने नवीन मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच जारी केली आहेत. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, कोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या तीन समित्यांनी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसच्या परिणामांसंदर्भात जी निरीक्षणे नोंदविली, त्याच्या आधारे या लसीच्या दोन डोसमधील अंतर आणखी वाढविण्यात आले आहे.

कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमध्ये चार ते सहा आठवड्यांचे अंतर राखण्यात आले आहे, तर कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचे अंतर राखावे असा आदेश केंद्र सरकारने नुकताच जारी केला आहे. पूर्वी हे अंतर सहा ते आठ आठवड्यांचे होते.

कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात उत्तम प्रमाणात अँटिबॉडीज तयार होतात, तर कोव्हॅक्सिन या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरच हा परिणाम दिसून येतो. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)चे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.

डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, कोरोनाच्या लसी १५ डिसेंबर रोजी उपलब्ध झाल्या. तेव्हापासून ते आजतागायत त्यांच्या परिणामांसंदर्भात आयसीएमआर सातत्याने अभ्यास करत आहे. कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसनंतर त्या लसीचा परिणाम अधिक चांगल्या प्रकारे साधला जातो हे लक्षात आल्याने आता उत्पादक कंपनी भारत बायोटेकवरही अधिकाधिक लसी उपलब्ध करून देण्याबाबत लोकांचा दबाव यापुढे वाढणार आहे.

फॉर्म्युला तीन सार्वजनिक कंपन्यांना - कोव्हॅक्सिन लसीचे हैदराबादबरोबरच कर्नाटकातील कोलार व महाराष्ट्रातील पुणेनजीकच्या मांजरी येथे लवकरच उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. कोव्हॅक्सिन लसी बनविण्याचा फॉर्म्युला तीन सार्वजनिक कंपन्यांना देण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या - कर्नाटक - ५,३४,९७५, महाराष्ट्र - ३,८५,७८५, केरळ - ३,१८,२२०, तामिळनाडू - २,६३,३९०, आंध्र प्रदेश - २,०९,१३४, राजस्थान -१,४३,९७४, प. बंगाल - १,३१,५१०, उ. प्रदेश - १,१६,४३४