बापरे! कोरोनासारख्या नव्या व्हायरसने वाढवलं टेन्शन, लसही ठरतेय फेल, तज्ज्ञांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 01:26 PM2022-09-27T13:26:55+5:302022-09-27T13:50:23+5:30

Khosta 2 : कोरोना व्हायरसचा प्रकोप हळूहळू कमी होत आहे. पण याच दरम्यान कोरोनासारखाच आणखी एक नवीन व्हायरस आढळून आला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रकोप हळूहळू कमी होत आहे. पण याच दरम्यान कोरोनासारखाच आणखी एक नवीन व्हायरस आढळून आला आहे. 'खोस्ता-2' (Khosta 2) असं या व्हायरसचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. चिंतेची बाब ही आहे की, या व्हायरसवर उपलब्ध असलेल्या कोरोना लसीचाही कोणताही परिणाम होत नाही.

पीएलओएस पॅथोजेन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन लेखात या व्हायरसबाबत धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. संशोधकांना वटवाघळांमध्ये हा नवीन व्हायरस आढळला आहे. यामुळे मानवी लोकसंख्या धोक्यात येऊ शकते. शास्त्रज्ञांना 2020 च्या सुरुवातीला रशियामध्ये हा व्हायरस आढळला होता. पण त्यावेळेस ते लोकांसाठी धोक्याचे ठरेल असे कोणालाच वाटले नव्हते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याच्या विधानामुळे लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता, त्याचे आता चिंतेमध्ये रूपांतर झाले आहे. खोस्ता 2 व्हायरस नेमका काय आहे, तो किती प्राणघातक आहे आणि त्यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेऊया...

2020 च्या शेवटी खोस्ता 2 व्हायरस आढळून आला. त्यादरम्यान रशियामधील राइनोलोफस वटवाघळांमध्ये दोन क्लॅड 3 सेर्बेकोव्हायरस आढळले गेले. हे दोन व्हायरस होते ज्यात खोस्ता 1 मध्ये (Khosta-1) आणि राइनोलोफस फेरुमेक्विनम आणि खोस्ता 2 मध्ये (Khosta 2) आर हिप्पोसाइडरोस आढळून आले. सोची राष्ट्रीय उद्यानाजवळ मार्च-ऑक्टोबर 2020 दरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये या व्हायरसची ओळख पटली.

अभ्यासात असे आढळून आले आहे की खोस्ता व्हायरसचे दोन प्रकार आहेत - खोस्ता व्हायरस 1 आणि खोस्ता व्हायरस 2. हे दोन व्हायरस विषाणूजन्य वंशातील आहेत जे सार्स-कोव 1 आणि 2 पेक्षा वेगळे आहेत. त्यापैकी, खोस्ता 2 हा व्हायरस एक वेगळा प्रकार आहे, जो मानवी पेशींवर हल्ला करण्यास सक्षम आहे. खोस्ता-2 म्हणून ओळखला जाणारा हा सेर्बेकोव्हायरस नावाच्या कोरोना व्हायरसच्या उप-श्रेणीचा आहे. हा SARS-CoV-2 चा एक प्रकार आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, आगामी काळात कोविडसारख्या साथीच्या रोगांपासून मानवांचे संरक्षण करण्यासाठी सरबेकोव्हायरस विरूद्ध सार्वत्रिक लस विकसित करण्याची गरज आहे. सरबेकोव्हायरस हा एक श्वसनाशी निगडीत व्हायरस आहे, कॉम्बिनेशन ही व्हायरसजन्य स्ट्रेनची नवीन स्ट्रेन तयार करण्याची प्रक्रिया आहे.

शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, खोस्ता 2 व्हायरस कोरोना व्हायरसच्या विरूद्ध असल्याने माणसांमध्ये गंभीर रोग निर्माण करण्याची क्षमता यामध्ये नाही. पण तरीही याचे माणसांमध्ये संक्रमण होऊ शकते आणि यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. जर ते कोविडच्या जीनमध्ये मिसळले ज्यामुळे कोरोना व्हायरस होतो तर अशा परिस्थितीत त्याचा प्रसार दर आरोग्य निरीक्षकांसाठी आणखी एक डोकेदुखी ठरणार आहे.

संशोधक टीमने सांगितले की, अलिकडच्या वर्षांत शेकडो सरबेकोव्हायरस सापडले आहेत, विशेषत: आशियातील वटवाघळांमध्ये. परंतु यापैकी बहुतेक मानवी पेशींना संक्रमित करू शकत नाहीत. डब्ल्यूएसयू व्हायरस शास्त्रज्ञ लेटको यांनी सांगितले की, 'आमच्या संशोधनातून पुढे असे दिसून आले आहे की हा सरबेकोव्हायरस आशियाबाहेरील वन्यप्राण्यांमध्ये वाढत आहे.

जगभरातील लोकांच्या आरोग्याला आणि SARS-CoV-2 विरुद्ध सुरू असलेल्या लस मोहिमांना धोका निर्माण झाला आहे. शास्त्रज्ञांना अभ्यासात असे आढळून आले आहे की, लस किंवा संसर्गामुळे मानवी शरीरात तयार होणाऱ्या कोणत्याही मानवी अँटिबॉडीज या व्हायरसला निकामी करू शकत नाहीत.

याचाच अर्थ स्पष्ट संकेत आहे की, सध्याच्या कोरोना लस किंवा कोरोना संसर्गापासून तयार होणाऱ्या अँटीबॉडीज खोस्ता-2 व्हायरसपासून माणसांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण देऊ शकत नाहीत. हा व्हायरस सध्या रशियामध्ये आढळून आला आहे आणि आतापर्यंत संसर्गाची काही प्रकरणे आणि संसर्गाची तीव्रता आढळून आली आहे.

खोस्ता 2 व्हायरसने एखाद्या व्यक्तीला संसर्ग केल्यावर कोणती लक्षणे दिसून येतात याबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पुन्हा एकदा नव्या व्हायरसने जगाचं टेन्शन वाढलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टर/ तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)