Omicron Variant: ओमायक्रॉन: घरात एखाद्यास कोरोनाची लागण झाल्यास काय करावं? जाणून घ्या सोप्या शब्दात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 10:01 PM2022-01-09T22:01:13+5:302022-01-09T22:08:39+5:30

Omicron Variant: संपूर्ण देशभरात आता कोरोनाचा पुन्हा एकदा हाहा:कार सुरू झाल्याचं दिसत आहे. भारतात ७ जानेवारी रोजीच कोरोना रुग्णसंख्येचा दैनंदिन आकडा १ लाखाच्या वर पोहोचला आहे. पण आपल्या कुटुंबात एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर नेमकं काय करावं? याची माहिती आपण सोप्या शब्दात जाणून घेऊयात...

ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार डेल्टा व्हेरिअंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरिअंट अधिक वेगानं पसरतो. त्यामुळेच या व्हेरिअंटची धास्ती निर्माण झाली आहे.

ओमायक्रॉनबाबत आजही सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. आपल्या घरात एखाद्याला कोरोनाची लागण झाली तर नेमकं काय करावं हाच मोठा प्रश्न अनेकांसमोर उपस्थित होऊ शकतो. अशावेळी नेमकं काय करावं हे आपण आता सोप्या पद्धतीत जाणून घेणार आहोत.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि पण कोणतीही लक्षणं नसतील तसंच त्यांचं वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल तर अशा रुग्णांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, होम क्वारंटाईन असतानाही स्वत:च्या आरोग्याबाबत सतर्क राहणं देखील महत्त्वाचं आहे. अधिक त्रास होत असल्यास रुग्णालयात दाखल होणं अधित उत्तम आहे.

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास सर्वात पहिल्यांना अजिबात घाबरून जाऊ नये. व्हेरिअंटची ओळख जीनोम सीक्वेन्सिंगनंतरच पटते. त्यामुळे सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये व्हेरिअंटचा उल्लेख रिपोर्टमध्ये केला जात नाही. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णानं तातडीनं घरातच वेगळ्या खोलीत क्वांरटाईन व्हावं. संबंधित खोली हवेशीर असणं गरजेचं आहे.

ओमायक्रॉन व्हेरिअंट असो किंवा मग इतर कोणताही. रुग्णानं कायम मास्कचा वापर करणं खूप गरजेचं आहे. इतर कोणत्याही व्यक्तीशी आपला संपर्क येणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. रुग्णानं एखाद्या डॉक्टरच्या संपर्कात राहावं. तसंच रक्तातील ऑक्सिजनची पातळी, हार्ट रेट देखील काही तासांच्या अंतरानं तपासून पाहावं. कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रुग्णानं कोणतीही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत.

आपल्या कुटुंबात एखाद्याला कोरोनाची लागण झाली असेल तर सर्वात आधी कुटुंबातील प्रत्येकानं भारत सरकारनं जारी केलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. यात कुटुंबीयांनी १४ दिवस होम क्वारंटाइन राहावं. त्यानंतर पुढील १४ दिवस कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं.

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील फक्त एका सदस्याची निवड करावी. लागण झालेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी केवळ एकाच व्यक्तीनं पुढाकार घ्यावा. रुग्णाच्या जवळ जाणाऱ्या व्यक्तीनं तीन स्तरांची सुरक्षा असलेला विशेषत: N95 मास्कचा वापर करावा. मास्कच्या बाहेरील आवरणाला स्पर्श करणं टाळावं. मास्क जुना किंवा ओला झाल्यास तो पुन्हा वापरू नये.

कोरोना विरोधात सर्वात महत्त्वाची लढाई म्हणजे वारंवार हात धुणं आणि हात स्वच्छ ठेवणं. हात नेहमी साबणानं किंवा हँडवॉशनं कमीत कमी ४० सेकंदांपर्यंत स्वच्छ धुवावेत. दिवसातून असं तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा आवर्जून करावं. विशेषत: रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर हात न चुकता धुवावेत.

रुग्णाच्या संपर्कात जास्त काळ येणार नाही याचाच जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तसंच रुग्णानं वापरेलेले कपडे, मास्कच्या संपर्का येऊ नये. रुग्ण वापरत असलेली भांडी, कपडे, टॉवेल, बेडशीट कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीनं वापरू नयेत. तसंच रुग्णासोबत जेवण करू नये.

होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णाची देखभाल करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीनं रुग्णाच्या आरोग्यावर लक्षपूर्वकपणे नजर ठेवावी. रुग्णाला अनेक दिवस १०० डीग्रीपेक्षा अधिक ताप असल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी झाल्यास, छातीत दुखणं आणि धाप लागत असल्यात तातडीनं वैद्यकीय मदत उपलब्ध करुन द्यावी.

होम आयसोलेशनच्या काळात घरात बराच वैद्यकीय कचरा जमा होतो. यात मास्क, सिरिंज, औषधं आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींचा सर्वाधिक समावेश असतो. या सर्व गोष्टींचा रुग्णाशी थेट संपर्क आलेला असतो आणि यातून संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे बायो-मेडिकल कचरा इतरत्र कुठेही न फेकता एका पॅकेटमध्ये किंवा प्लास्टिकमध्ये जमा करावा आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली गेली पाहिजे.