उन्हाळ्यात फंगल इन्फेक्शनच्या त्रासाने हैराण आहात? तर 'या' उपायांनी मिळवा त्रासापासून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 04:06 PM2020-05-17T16:06:49+5:302020-05-17T16:23:46+5:30

दिवसेंदिवस तापमान अधिकाधिक वाढत आहे. त्यामुळे अनेकांना त्वचेच्या संबंधित समस्या उद्भवत आहेत. कारण घाम आल्यामुळे त्वचेवर पुळ्या येतात. सतत खाजवल्यामुळे ही सवय महागात पडण्याची शक्यता असते. कारण खाजवल्यामुळे त्वचा लाल होऊन चट्टे तयार होतात. पुळ्या आल्यानंतर अनेकदा शरीरावर गोल रिंग तयार होते. त्याला रिंगवर्म असं म्हणतात. त्यामुळेच त्वचेवर फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.

अनेकदा त्वचेचा काही भाग ओला असल्यामुळे रिंगवर्म येण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात घाम येण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ही समस्या वाढत जाते. आज आम्ही तुम्हाला काही खास घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वपर करून तुम्ही या त्वचा विकारांपासून सुटका मिळवू शकता.

रिंगवर्मची समस्या असल्यास कडुलिंबाच्या पानाची पेस्ट तयार करून इन्फेक्टेड ठिकाणी लावा. कडुलिंबात अनेक एंटी बॅक्टिरिअल, एंटी फंगल गुण असतात. तसंच त्वचेला थंडावा देणार गुणधर्म यात असतो. फक्त दहा मिनिटं त्या ठिकाणी कडुलिंबाचा पेस्ट लावून नंतर धुवून टाका. हा प्रयोग केल्यास तुम्हाला बदल दिसून येईल.

जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन किंवा रिंग वर्म झाल्यास चंदनाच्या तेलात लिंबाचा रस घालून सात ते आठ वेळा इन्फेक्टेड ठिकाणी लावा. हा प्रयोग केल्यास त्वचेला आराम मिळेल.

कधी कधी शरीरावर गोल रिंग लालसर रंगाच्या तयार होतात आणि खाज यायला सुरूवात होते. पण बाजारात अनेक क्रिम्स असतात. ज्या फंगल इन्फेक्शनचा तात्पुरता नाहिसं करतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा ही समस्या उद्भवते. कारण समस्या नष्ट होण्याऐवजी काही वेळासाठी क्रिममुळे दाबली जाते आणि पुन्हा त्वचेवर चट्टे येतात. झेंडूचं फुल फक्त पुजेसाठी वापरलं जातं असं नाही. यात अनेक एंटी- फंगल एंटी एलर्जीक गुण असतात.

त्यासाठी सगळ्यात आधी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या करून घ्या. या पाकळ्या उकळत्या पाण्यात घाला. हे पाणी काही वेळ गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. हे पाणी थंड झाल्यानंतर शरीराच्या ज्या ठिकाणी तुम्हाला खाज येत आहे. अशा ठिकाणी लावा. नंतर तो भाग धुवून टाका. याशिवाय दुसरी पध्दत म्हणजे झेंडूच्या फुलांची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट इन्फेक्शन झालेल्या भागांना लावा. त्यामुळे तुमच्या शरीरावरील खाज चट्टे निघून जाण्यास मदत होईल.

फंगल इन्फेक्शनमध्ये सर्वात गुणकारी औषध म्हणजे तुरटी. तुरटीचं पाणी इन्फेक्शन झालेल्या जागी लावावं ते पुसून टाकू नये. आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी.

कोरफडीचा गर काढून तो फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावावा. त्यामुळे खाज सुटणार नाही. त्वचेची आग होणार नाही. पण हे करत असताना कोणताही साबण किंवा केमिकल असलेल्या क्रीम काही दिवस त्वचेवर लावू नका.

खोबरेल तेल फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावून मालिश करावी. दालचिनीचं तेल आणि खोबरेल तेल दोन्ही समप्रमाणात घेऊन लावावं. मात्र सगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शनला चालेल असं नाही त्यामुळे डॉक्टरांनी तेल लावू नये असं सांगितलं असेल तर डॉक्टरांचा सल्ला पाळावा.