Coronavirus : अरेss बापरे...कोरोनाची लस यायला अडीच वर्षं लागणार; WHO काय म्हणतंय बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:03 PM2020-06-23T15:03:25+5:302020-06-23T15:19:05+5:30

एका उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुळात आतापर्यंत असा कोणता प्रयोग झाला नाही ज्यावरून असा विश्वास बसेल की, कोरोना व्हायरसची वॅक्सीन तयार झाली आहे.

जगातल्या वेगवेगळ्या देशांतील वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसवर वॅक्सीन शोधल्याचा दावा केला आहे. अनेक वॅक्सीनचे तर ह्यूमन ट्रायलही शेवटच्या टप्प्यात असल्याचीही माहिती समोर येत असते. पण WHO च्या एका उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुळात आतापर्यंत असा कोणता प्रयोग झाला नाही ज्यावरून असा विश्वास बसेल की, कोरोना व्हायरसची वॅक्सीन तयार झाली आहे. आता WHO च्या एका अधिकाऱ्यांनी अशाप्रकारची माहिती दिल्याने चिंता नक्कीच वाढणार आहे.

सोमवारी दुबई सरकारकडून आयोजित 8व्या विश्व सरकार संमेलनात WHO चे वरिष्ठ अधिकारी डॉ. डेविड नबॅरो म्हणाले की, 'साऱ्या जगाची नजर कोरोना व्हायरसच्या वॅक्सीनकडे लागलेली आहे. पण या महामारीला दूर करण्यासाठीची वॅक्सीन येण्यास आता अडीच वर्षे आणखी लागू शकतात'.

डॉक्टर नबॅरो यांनी सांगितले की, 'कोरोना व्हायरसची वॅक्सीन जर यावर्षाच्या शेवटी तयार झाली तरी त्याच्या प्रभाव आणि सुरक्षेबाबत टेस्ट करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. सोबत ही महामारी मुळातून दूर करण्यासाठी वॅक्सीनचं मोठ्या प्रमाणात प्रॉडक्शन करावं लागेल. ज्यात बराच वेळ लागू शकतो'.

डेविड नबॅरो म्हणाले की, जर माझा अंदाज चुकीचा ठरला तर मलाच जास्त आनंद होईल. या आजाराचा सामना कुणी एक व्यक्ती नाही तर जगातील लोक करत आहेत. हा व्हायरस अजूनही आपल्या जवळ आहे. तो प्रत्येकाला प्रभावित करेल.

आपल्या कामाच्या अनुभवाबाबत ते म्हणाले की, 'आतापर्यंत मलेरिया आणि एचआयव्हीसारख्या आजारांवर वॅक्सीन तयार होऊ शकलेली नाही. मी फक्त इतकं सांगू शकतो की, यावर्षी जर एखादा चमत्कार झाला नाही तर कोरोनाची वॅक्सीन मिळणं फार कठिण आहे'.

सुरूवातीपासूनच चीन, अमेरिका आणि यूरोप कोरोना व्हायरसच्या संभावित वॅक्सीन कॅडिंडेटबाबत वेगवेगळे दावे करत आहेत. पण वॅक्सीन तयार झाल्यावरही याचा प्रभाव आणि सुरक्षेची तपासणी करण्यात साधारण सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

ते म्हणाले की, एक आदर्श वॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित असणं गरजेचं आहे. रूग्णांवर त्याचे कोणतेही साइड इफेक्ट होऊ नये. असं होऊ नये की, रूग्णाला या आजारापासून वाचवण्यासाठी वॅक्सीन द्यावी आणि त्यातून एक नवा आजार समोर यावा.

सध्या जगातील वेगवेगळे देश त्यांनी वॅक्सीन तयार केल्याचा दावा करत आहेत. पण अजूनही अधिकृत किंवा ठोस उपाय यावर सापडलेला नाही. अशात WHO च्या अधिकाऱ्याकडून असं सांगणं चिंता वाढवणारं आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनाने 91 लाखांपेक्षा अधिक लोकांना शिकार केलंय. तर 4 लाख 74 हजारपेक्षा जास्त लोकांना जीव गेलाय. कोरोना केसेसबाबत भारत आता 4 लाख 40 हजार केसेससोबत ब्रिटनपुढे आहे. भारत आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 14 हजार लोकांचा जीव गेलाय.

Read in English