'या' अवयवांना सतत हात लावणं ठरू शकतं कोरोना संक्रमणाचं मोठं कारणं; 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 01:25 PM2020-06-14T13:25:47+5:302020-06-14T13:45:53+5:30

सध्या कोरोना व्हायरसच्या माहामारीने थैमान घातल्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. लोक हळूहळू घराबाहरे पडू लागले आहेत. कोरोनासोबत जगत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच वैयक्तिक स्वच्छतेबाबत काही गोष्टी माहित असायला हव्यात तेव्हाच तुम्ही संक्रमणाचा सामना करू शकता

शरीरातील काही भागांना सतत आणि कारण नसताना स्पर्श करणं हे आजारांना निमंत्रण दिल्याप्रमाणे असू शकतं. कारण सध्या कोरोनाच्या प्रसाराबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.

ओठ : महिला कित्येक तरी वेळा ओठांना स्पर्श करतात. काही पुरुषांनाही याची सवय असते. यामुळे ओठांच्या त्वचेचं नुकसान होतं. शिवाय ओठांच्या आकारवरही परिणाम होऊ शकतो. शिवाय हात स्वच्छ धुतलेले नसतील तर हातावरील जंतू तोंडात जाण्याची शक्यताही असते.

डोळे : डोळे हा खूप संवेदनशील अवयव आहे. अनेकांना डोळे चोळण्याची सवय असते. थकवा आल्यानंतरही आपण डोळ्यांवर हात फिरवतो. अशावेळी जर हात स्वच्छ धुतलेले नसतील तर हातांवरील धुळ किंवा किटाणू डोळ्यात प्रवेश करू शकतात. त्यामुळे संक्रमणाचा धोका जास्त असतो.

नाक: अनेकांना नाकात बोटं घालण्याची सवय असते. नाकामार्फत एखादा विषाणू, शरीरात प्रवेश करू शकतो. यामुळे श्वसनसंबंधी आजार उद्भवण्याचा धोका उद्भवतो तसंच फुफ्फुसांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. नाकाला हात लावण्याची सवय तशी पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कमी असते. तरीही गरज नसताना स्पर्श केला जाणार नाही. याची खबरदारी घ्यायला हवी.

कान : काही जण बोटांनीच आपले कान साफ करतात. किंवा कानात काडी, चावी असं काहीतरी टाकतात. हे नुकसानकारक ठरू शकतं. बोटांवर जंतू किंवा विषाणू असतील तर ते कानात जाऊन संक्रमण होऊ शकतो. यामुळे काही वेळा कानात सूजही येऊ शकते.

तोंड : जेवल्यानंतर दातांमध्ये अडकलेलं अन्न बोटांनी काढण्याची सवय अनेकांना असते. यामुळेदेखील हातावरील अनेक विषाणू तोंडात प्रवेश करू शकतात. त्यामुळे ही सवय बदलायला हवी. ब्रश, पाणी किंवा माऊथ वॉशने तोंड स्वच्छ करा.