Corona Vaccination : तुम्ही घेताय ती लस अस्सल आहे ना? बनावट लसी आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 09:38 AM2021-08-21T09:38:42+5:302021-08-21T09:49:14+5:30

Corona Vaccination: भारत आणि युगांडा येथे या बनावट लसी आढळल्या.

कोरोनाप्रतिबंधक लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. भारतात कोविशिल्डबरोबरच कोव्हॅक्सिन या लसीचेही उत्पादन सुरू आहे.

कोविशिल्ड लसीच्या बनावट मात्रा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भारत आणि युगांडा येथे या बनावट लसी आढळल्या.

बनावट लसींचा मोठा दुष्परिणाम लोकांवर होण्याचा धोका असतो. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवरही ताण पडतो. त्यामुळेच जगाच्या पाठीवर कुठेही कोरोनाप्रतिबंधक बनावट लसी आढळल्यास त्या तातडीने नष्ट करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या आहेत.

युगांडामध्ये कोविशिल्डच्या पाच मिलीग्रॅम लसीच्या कुप्या आढळल्या. या कुप्यांवर दहा डोस बनविण्याची क्षमता असे लिहिले असून एक्सपायरी डेट १० ऑगस्ट असे होते. तेथील यंत्रणांना या लसमात्रांबाबत शंका आल्याने त्यांनी भारतीय यंत्रणांशी संपर्क साधला.

आपण बनवतच नसल्याचे कोविशिल्डचे निर्माते असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे. बनावट लसीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ताबडतोब जागतिक आरोग्य संघटनेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

केवळ कोविशिल्डच नव्हे तर याआधी फायझरच्या लसीबाबतही हाच प्रकार घडला होता. फायझर-बायोएन्टेक लसीच्या नकली मात्रा युरोपातील काही देशांमध्ये सापडल्याने खळबळ उडाली होती.तेथील सरकारांनी वेळीच हस्तक्षेप करत लसींचे उत्पादन थांबवले.