कर्करोगावर सापडला रामबाण उपाय? इतिहासात प्रथमच दुर्धर आजार पूर्णपणे झाला बरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 01:28 PM2022-06-08T13:28:12+5:302022-06-08T13:51:48+5:30

Cancer : आता कर्करोग खडखडीत बरा होऊ शकेल, अशा औषधाचा शोध लागला असल्याचा दावा केला जात आहे. काय आहे पाहू या...

जगभरात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यावरील उपचारपद्धतीही सातत्याने बदलत आहेत. अधिक आधुनिक होत आहेत. मात्र, आता कर्करोग खडखडीत बरा होऊ शकेल, अशा औषधाचा शोध लागला असल्याचा दावा केला जात आहे. काय आहे पाहू या...

न्यूयॉर्क येथील मेमोरिअल स्लोआन केटरिंग कॅन्सर सेंटर या संस्थेने १८ जणांवर प्रयोग केला.या १८ जणांना गुदाशयाचा कर्करोग झाला होता. या सर्वांना सलग सहा महिने डोस्टार्लिमॅब हे औषध देण्यात आले.

सहा महिन्यांनंतर या सर्व कर्करुग्णांचा गुदाशयातील कर्करोग पूर्णपणे बरा झाल्याचे आढळून आले. कर्करोगाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे एका औषधामुळे हा दुर्धर आजार पूर्णपणे बरा झाला आहे.

डोस्टार्लिमॅब औषधाची चाचणी करण्यापूर्वी प्रयोगात सहभागी झालेल्या कर्करुग्णांना अनेक उपचारपद्धतींतून जावे लागले होते. या उपचारपद्धतींमध्ये केमोथेरपी, रेडिएशन आणि इन्व्हेसिव्ह सर्जरी इत्यादींचा समावेश होता.

त्यामुळे डोस्टार्लिमॅब घेणे हा उपचाराचा पुढील टप्पा असेल, असा रुग्णांचा समज होता.परंतु सहा महिन्यांनी कर्करोग पूर्णपणे बरा झाल्याचे कळताच सर्वांच्याच डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

प्रयोगशाळेत तयार केलेल्या रेणूंपासून डोस्टार्लिमॅबची निर्मिती करण्यात आली आहे. मानवी शरीरात हे औषध पर्यायी प्रतिजैवक म्हणून काम करते. गुदाशयाचा कर्करोग असलेल्या १८ रुग्णांवर प्रथमच या औषधाचा वापर करण्यात आला.

आश्चर्य म्हणजे उपचारानंतर या सगळ्यांच्या शरीरातून कर्करोगाच्या पेशी पूर्णपणे नष्ट झाल्या. एण्डोस्कोपी, पोझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन या कशातही रुग्णांमध्ये कर्करोगाच्या पेशी असल्याचे दिसून आले नाही. डोस्टार्लिमॅबच्या प्रयोगाचा हा पहिला टप्पा होता. अजून मोठ्या संख्येने त्याच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.